कोल्हापूर, १८ जुलै (वार्ता.) – भारतीय डाक विभागाने ‘टाटा एआयजी’च्या अपघात संरक्षण विमा या योजनेशी करार करून प्रतिवर्ष २९९ किंवा ३९९ रुपयांच्या हप्त्यात १० लाख रुपयांचे विमा कवच योजना चालू केली आहे. टपाल विभागाने देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी ही नवीन योजना आणली आहे. ही योजना १८ ते ६५ वर्षे वयोगटांतील व्यक्तींसाठी आहे.
१. यामध्ये विमाधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास, तसेच त्याला अपंगत्व किंवा कायमचे आंशिक अपंगत्व आल्यास १० लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण दिले जाईल.
२. यासह या विम्यामध्ये उपचारांसाठी रुग्णालयात भरती झाल्यास ६० सहस्र रुपयांपर्यंतचा व्यय, तर रुग्णालयात भरती न होता घरी उपचार घेतल्यास ३० सहस्र रुपयांपर्यंत रक्कम मिळण्यासाठी दावा करता येईल. रुग्णालयाच्या व्ययासाठी १० दिवस प्रतिदिन १ सहस्र रुपये मिळतील.
३. या विम्याच्या अंतर्गत अपघातात व्यक्तीचा मृत्यू झाल्यास तिच्या अंतिम संस्कारासाठी ५ सहस्र रुपये, तर तिच्या किमान २ मुलांच्या शिक्षणासाठी १ लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळणार आहे.
४. या योजनेचा कालावधी एक वर्षाचा असून एक वर्ष संपल्यानंतर पुढील वर्षीसाठी विमा योजनेचे जवळच्या कोणत्याही पोस्ट कार्यालयात जाऊन नूतनीकरण करता येणार आहे.
५. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांचे ‘इंडिया पोस्ट पेमेंट बँके’त खाते असणे आवश्यक आहे. ते नसेल, तर नव्याने खाते उघडून या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.