कोल्हापूर, १५ जुलै (वार्ता.) – भविष्यात पूरस्थिती निर्माण झाल्यास कोणतीही अडचण भासू नये, यादृष्टीने पूर व्यवस्थापनासाठी सर्व विभागांना आवश्यक साधनसामग्री आणि उपाययोजना यांचा समावेश असणारा जिल्ह्याचा एकत्रित परिपूर्ण प्रस्ताव राज्यशासनाकडे सादर करावा, अशी सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली पूर व्यवस्थापन नियोजन आढावा बैठक घेण्यात आली, या वेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांसह अन्य अधिकारी उपस्थित होते.
श्री. राजेश क्षीरसागर पुढे म्हणाले, ‘‘अतीवृष्टी आणि पूरस्थिती यांमुळे जिल्ह्यातील गडदुर्गांचे बुरूज ढासळून हानी होऊ नये, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात. महामार्गावर पुराचे पाणी येऊन वाहतूक खोळंबू नये, यासाठी केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या सूचनांनुसार गतीने उपाययोजना राबवाव्यात. पुराच्या पाण्यात बुडणारे विद्युत् मीटर उंच ठिकाणी बसवून घ्यावेत.’’