राज्यात पावसाचे ९९ बळी !

आतापर्यंत ८ सहस्र नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – मुसळधार पावसामुळे राज्यात आतापर्यंत ९९ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ८ सहस्र नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. पालघर, रायगड, नाशिक, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांत अजूनही हवामान विभागाने दिलेली ‘रेड अलर्ट’ची चेतावणी तशीच आहे. उर्वरित जिल्ह्यांत काही प्रमाणात पावसाची उघडीप राहील, असा अंदाज आहे.

१. सलग ६ दिवस राज्यात जोरदार पाऊस पडल्यानंतर कोकण आणि काही जिल्हे वगळता उर्वरित महाराष्ट्रात पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे रस्त्यांवरील पाणी अल्प झाले असून अनेक मार्गांवरील बंद झालेली वाहतूक चालू झाली आहे.

२. मुंबई येथेही पावसाने विश्रांती घेतल्याने लोकल वाहतूक आणि रस्ते मार्गावरील वाहतूक सुरळीत चालू आहे.

३. वर्धा जिल्ह्यातील धनोडी येथील निम्न वर्धा प्रकल्पाचे १७ दरवाजे १५ जुलै या दिवशी सकाळी ६ वाजता ९० सेंटीमीटरने उघडण्यात आले. प्रकल्पातून १ सहस्र २५३.१६ घनमीटर/सेकंद या वेगाने वर्धा नदीच्या पात्रात विसर्ग चालू आहे. नदीपात्राच्या दोन्ही काठांवरील गावांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला असून शाळांना २ दिवस सुटी घोषित करण्यात आली आहे.

४. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने धरणाचा पाणीसाठा ४७.०५ टी.एम्.सी. झाला आहे. कोयना नदीच्या पात्रात २ सहस्र १०० क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे.

५. उरमोडी धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस असल्याने धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. धरणातील पाणीपातळी निर्धारित पाणीपातळीपेक्षा अधिक झाल्यामुळे सांडव्यावरील वक्रद्वारामधून उरमोडी नदीच्या पात्रात २ सहस्र क्युसेक्स विसर्ग सोडण्यात येणार आहे. ‘उरमोडी नदीकाठावरील ग्रामस्थ आणि शेतकरी यांनी कोणत्याही कारणास्तव नदीच्या पात्रात प्रवेश करू नये’, अशी सूचना देण्यात आली आहे.


पंचगंगा नदीची पातळी ३७ फूट ८ इंच झाल्याने ती धोक्याच्या पातळीच्या अगदी जवळ !

प्रयागचिखली, आंबेवाडी गावातील ग्रामस्थांचे स्थलांतर !

कोल्हापूर, १५ जुलै (वार्ता.) – संततधार पावसामुळे पंचगंगा नदीची पातळी ३७ फूट ८ इंच झाल्याने ती धोक्याच्या पातळीपासून केवळ दीड फूट राहिली आहे. (धोक्याची पातळी ३९ फूट). एकूण ६४ बंधारे पाण्याखाली गेले असून या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. गांधीनगर येथे रेल्वे रुळाच्या जवळपास पाणी आल्याने कोल्हापूर-मिरज रेल्वे वाहतूक काहीशी संथ गतीने चालू आहे. १५ जुलै या दिवशी दिवसभरात पावसाने मधूनमधून उघडीप दिली होती; मात्र पुराची धास्ती कायम आहे. संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर प्रयागचिखली, आंबेवाडी या गावांतील ग्रामस्थांचे स्थलांतर चालू झाले असून हे ग्रामस्थ प्रापंचिक साहित्य घेऊन सुरक्षित स्थळी रवाना झाले आहेत.