|
नाशिक – येथील गडावर असलेले भगवती सप्तश्रृंगीदेवीचे मंदिर येत्या २१ जुलैपासून अनुमाने दीड मास बंद ठेवण्याच्या विश्वस्त मंडळाच्या निर्णयाला भाविकांनी हरकत घेण्यास प्रारंभ केला आहे. वणी देवस्थान विश्वस्त मंडळाने मनमानी पद्धतीने मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मंदिर बंद ठेऊन मंदिराच्या आतमध्ये ज्या कृती केल्या जातात, त्या कॅमेर्यासमोर केल्या जाणे आवश्यक आहे, अशी मागणी त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी जिल्हाधिकार्यांकडे एका निवेदनाद्वारे दिली. ‘मंदिर बंद ठेवून देवस्थान नेमके काय करणार आहे ?’, याचा खुलासा त्यांनी केला पाहिजे, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की,
१. भारतात आदिशक्तीची ५१ शक्तीपीठे आहेत. त्यांपैकी महाराष्ट्रात साडेतीन शक्तीपीठे आहेत. यांतील सप्तश्रृंगीच्या शक्तीपीठाला महत्त्व आहे.
२. भारतामधून देवीचे भक्त सप्तश्रृंगी गडावर देवीच्या दर्शनाला येत असतात. असा निर्णय घेण्यामागे देवस्थानने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.
३. केवळ पत्रक काढून मंदिर बंद ठेवण्याविषयी माहिती दिली आहे. त्यामुळे देवीभक्तांत संभ्रमावस्था आहे. मंदिर बंद ठेवण्याच्या काळात देवस्थानाकडून भगवतीच्या मूळ मूर्तीत काही पालट करण्यात येणार आहेत का ? वज्रलेप करण्याचा काही निर्णय घेण्यात आलेला आहे का ?
४. ‘देवीच्या मूर्तीविषयी देवस्थान संवर्धन करणार आहे’, असे म्हटले आहे. याविषयी संस्थानने पुरातत्व विभाग आणि महाराष्ट्र शासन यांची रितसर अनुमती घेतली आहे का ?
५. मूर्तीला हात लावण्याविषयी पुरातत्व विभागाची तज्ञ समिती वणी देवस्थानला भेट देऊन गेली आहे का ?
६. वणी देवस्थान खासगी संस्थांना पाचारण करून देवीच्या मूळ स्वरूपाला धक्का लावण्याची गंभीर गोष्ट करणार आहे, अशी माहिती आम्हाला मिळाली आहे.
७. मुळात खासगी संस्थांना अशा देवीच्या स्वयंभू मूर्तीला हात लावण्याचा किंवा तिच्यामध्ये काही पालट करण्याचा कोणताही अधिकार नाही.
८. सर्व पीठाचे शंकराचार्य, साधू-महंत आणि मूर्तीकार तज्ञ यांना बोलावून कोणती धर्मसभा बोलावली नाही, तसेच वणी ग्रामस्थ, सरपंच आणि सदस्य ग्रामपंचायत यांना विश्वासात घेतलेले नाही.
९. वणी देवस्थान ट्रस्टने खासगी संस्था ‘अजिंक्यतारा कन्सलटंट’ याच्या साहाय्याने मंदिराच्या आवारात काही पालट करण्याचे जे प्रयत्न चालू केले आहेत, ते कॅमेर्यासमोर व्हावेत.