पाकमध्ये अहमदी समाजातील तिघांना ईदच्या वेळी बकरा आणि गाय यांच्या हत्या केल्याने अटक

पाकच्या कायद्यानुसार अहमदी गैर मुसलमान असल्याने त्यांना ईद साजरी करण्याचा अधिकार नाही !

लाहोर (पाकिस्तान) – पाकच्या पंजाब प्रांतातील पोलिसांनी अल्पसंख्य अहमदी समाजाच्या तिघांना ईदच्या दिवशी १ बकरा आणि १ गाय यांची हत्या केल्याच्या प्रकरणी अटक केली. वर्ष १९७४ मध्ये पाकिस्तानने राज्यघटनेत सुधारणा करून अहमदी समाजाला गैर मुसलमान घोषित केले आहे. पाकिस्तान दंड संहितेच्या कलम ‘२९८ क’च्या अनुसार हा समाज कोणत्याही इस्लामी परंपरेचे पालन करू शकत नाही.

अहमदी समाजावर अनेक वर्षांपासून चालू आहेत अत्याचार !

अहमदी समाजाला ‘काफीर’ (इस्लाम न मानणारे) ठरवून येथे प्रतिर्षी शेकडो लोकांची हत्या केली जाते. त्यांच्यावर अल्लाचा अवमान केल्याचेही आरोप केला जातात. अहमदी मुसलमानाचे मृतदेह कब्रस्तानात पुरण्यासही विरोध केला जातो. पाकमध्ये विविध ३९ ठिकाणी अहमदींचे पुरण्यात आलेले मृतदेह बाहेर काढण्याच्या घटना घडलेल्या आहेत.

अहमदी संप्रदायाविषयी माहिती

इस्लाममध्ये साधारण ७३ संप्रदाय आहेत. त्यांतील अहमदी हा एक संप्रदाय आहे. त्याची स्थापना वर्ष १८८९ मध्ये मिर्झा गुलाम अहमद यांनी केेली होती. इस्लाममध्ये महंमद पैगंबर हे एकमेव प्रेषित आहेत; मात्र अहमद यांनी स्वतःला प्रेषित मानले होते. ते स्वतःला ‘मसीहा’ (जगाचे कल्याण करण्यासाठी अवतार घेतलेली व्यक्ती) मानत. या कारणांमुळेच अन्य मुसलमान समाज अहमदी संप्रदायाच्या मुसलमानांना ‘मुसलमान’ न समजता ‘काफीर’ समजतात.

संपादकीय भूमिका 

‘हिंदु धर्मामध्ये जाती-जमाती असून हिंदु समाज दुभंगलेला आहे’, असे म्हणणारे इस्लाममध्ये शिया-सुन्नी यांच्यात होणारा हिंसाचार किंवा मुसलमान समाजाकडून अहमदी लोकांवर केलेले अत्याचार यांविषयी मात्र चकार शब्दही काढत नाहीत !