‘पितांबरी सांस्कृतिक मंचा’चा उपक्रम !
ठाणे – आषाढी एकादशीच्या निमित्ताने ‘पितांबरी सांस्कृतिक मंचा’च्या वतीने सुप्रसिद्ध निरूपणकार सौ. धनश्री लेले यांचे ‘ज्ञानेश्वरीतील काव्य आणि विचारसौंदर्य’ या विषयावरील व्याख्यान ठाण्यातील सहयोग मंदिरात पार पडले. प्राचार्य श्री. अशोक चिटणीस हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. भगवद्गीतेतील तत्त्वज्ञान सांगणार्या ‘ज्ञानेश्वरी’ या ग्रंथातील काव्य आणि विचारसौंदर्य अतिशय सोप्या शब्दांमध्ये आणि प्रतिदिनच्या जीवनातील दाखले देत सौ. धनश्री लेले यांनी श्रोत्यांसमोर उलगडून दाखवले. ‘भगवद्गीता हा जरी कुरुक्षेत्रावर श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश असला, तरी संत ज्ञानेश्वर माऊलींनी तरल कवीमनाने त्याची मांडणी ज्ञानेश्वरीतून केली आहे. त्यातील बोध आपल्यापैकी प्रत्येकासाठी दैनंदिन जीवनाातही मार्गदर्शक आहे’, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. अशोक चिटणीस यांनी अशा स्तुत्य उपक्रमासाठी पितांबरीला धन्यवाद दिले. अशा विषयांवरील कार्यक्रमांच्या श्रोत्यांमध्ये तरुणांचा सहभाग वाढण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. पितांबरीचे उपाध्यक्ष श्री. परीक्षित प्रभुदेसाई, ‘मिडिया मॅनेजर’ सौ. प्रिया प्रभुदेसाई यांच्यासह ठाण्यातील अनेक मान्यवर मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित होती. रसिक श्रोत्यांनी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद दिला.
‘पितांबरी सांस्कृतिक मंचा’कडून भविष्यात सांस्कृतिक, साहित्यिक, आर्थिक, सामाजिक आणि आध्यात्मिक विषयांवरील कार्यक्रमांचे आयोजन ! – रवींद्र प्रभुदेसाई‘पितांबरी सांस्कृतिक मंचा’ची संकल्पना विशद करताना पितांबरीचे व्यस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई म्हणाले, ‘‘पितांबरी आस्थापन नेहमीच वेगवेगळ्या कार्यक्रमांना प्रायोजकत्व देत असते; मात्र पितांबरीच्या वतीने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून वेगवेगळ्या विषयांवर आधारित कार्यक्रमांचे आयोजन करण्याच्या उद्देशाने ‘पितांबरी सांस्कृतिक मंच’ हा उपक्रम चालू करण्यात आला आहे. या अंतर्गत यापुढील काळात सांस्कृतिक, साहित्यिक, आर्थिक, सामाजिक आणि आध्यात्मिक अशा विविध विषयांवरील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.’’ |