‘१६.१२.२०२० या दिवशी सकाळी ७.३० ते ७.४० या कालावधीत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरात असलेल्या चिनी मातीच्या ‘मग’ (Cup) वरच्या स्टीलच्या झाकणावर सूर्यप्रकाश पडला. तेथून तो सूर्यप्रकाश देवघराच्या मागच्या बाजूच्या लाकडी पार्श्वभूमीवर परावर्तित झाल्यावर मोरपिसाच्या आकाराप्रमाणे दिसला. यामागील अध्यात्मशास्त्र पुढीलप्रमाणे आहे.
१. सध्या चालू असलेल्या घोर कलियुगातील आपत्काळापासून विश्वातील समस्त साधकांचे रक्षण करण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामध्ये कार्यरत झालेल्या श्रीकृष्णतत्त्वमय चैतन्य लहरींचे पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश या पंचतत्त्वांच्या स्तरांवर पुष्कळ प्रमाणात प्रक्षेपण होणे
सध्या कलियुगातील तीव्र आपत्काळ चालू आहे. या तीव्र आपत्काळामध्ये विश्वातील समस्त साधकांचे रक्षण करण्यासाठी विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून संपूर्ण विश्वात श्रीकृष्णतत्त्वमय चैतन्य लहरींचे पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश या पंचतत्त्वांच्या स्तरावरील लहरींचे प्रक्षेपण मोठ्या प्रमाणात होत आहे. या पंचतत्त्वांच्या स्तरावर प्रक्षेपित झालेल्या चैतन्यदायी श्रीकृष्णतत्त्वमय लहरींमुळे संपूर्ण पृथ्वीवरील साधकांना विविध प्रकारच्या दैवी अनुभूती येत आहेत.
२. सनातनचे आश्रम आणि साधकांची घरे येथे पंचतत्त्वांनुसार येणाऱ्या अनुभूती
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरातील देवतांची चित्रे आणि मूर्ती यांमध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील कृष्णतत्त्व सूक्ष्मरूपाने सामावलेले आहे. त्यामुळे त्यांच्या देवघरातील देवतांची चित्रे आणि मूर्ती यांना सूर्यप्रकाशाच्या रूपाने तेजतत्त्वातील चैतन्यलहरींचा स्थूल आणि सूक्ष्म किरणांच्या रूपाने स्पर्श होतो. तेव्हा देवतांची चित्रे आणि मूर्ती यांच्यामध्ये सुप्त रूपाने वास करणारे कृष्णतत्त्व जागृत होऊन ते मोरपिसाच्या आकाराच्या प्रतिबिंबाच्या रूपाने स्थुलातून साकार होते. ‘मोरपीस’ हे कृष्णतत्त्व आणि आनंद यांचे प्रतीक आहे.
३. मोरपिसाप्रमाणे दिसणाऱ्या आकाराची आध्यात्मिक वैशिष्ट्ये
अ. तेजोमय चैतन्यलहरींचे वायूमंडलात प्रक्षेपण होऊन वायूमंडलाची शुद्धी होते.
आ. मोरपिसाच्या आकाराच्या किरणांतून श्रीकृष्णाच्या प्रकट अवस्थेतील तेजोमय किरणांचे प्रक्षेपण झाल्यामुळे या आकारातून पुष्कळ प्रमाणात आनंदाच्या लहरींचे प्रक्षेपण होऊन वातावरण आनंदमय होते.
इ. मोरपिसाच्या मध्यभागी श्रीकृष्णाचे तत्त्व अप्रकट अवस्थेत आहे. त्यामुळे त्याकडे पाहून शांतीची अनुभूती येते.
४. कृतज्ञता
श्रीगुरूंच्या कृपेमुळे मोरपिसाच्या आकारात पडलेल्या सूर्यकिरणांच्या परावर्तनामागील अध्यात्मशास्त्र समजले, यासाठी मी श्रीगुरुचरणी कोटीश: कृतज्ञ आहे.’
– कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.२.२०२२)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
सूक्ष्म परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म परीक्षण’ म्हणतात. येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |