पक्षांतर्गत वाढलेल्या विरोधामुळे शेवटी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पक्षाच्या संसदीय गटनेते पदाचे त्यागपत्र दिले आहे. लवकरच त्यांना पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावे लागेल, हे जवळजवळ निश्चित आहे. नवीन पंतप्रधानांच्या नियुक्तीपर्यंत बोरिस जॉन्सन यांना पंतप्रधानपदाचे दायित्व पहावे लागणार आहे. विशेष म्हणजे मागील मासातच ब्रिटनच्या संसदेमध्ये जॉन्सन यांनी अविश्वास ठराव जिंकला होता. असे असतांनाही एका घटनेवरून मासाभरातच त्यांना पायउतार व्हावे लागले. संसदेत अविश्वासाचा ठराव जिंकूनही पक्षातील नेत्यांनी केलेल्या तीव्र विरोधामुळे बोरिस जॉन्सन यांना पंतप्रधानपदावरून हटावे लागले आहे, हे येथे लक्षात घेण्यासारखे आहे. स्वत:च्या मजूर पक्षाच्या ४१ खासदारांनी पदाचे त्यागपत्र दिल्यामुळे पंतप्रधानपदाचे त्यागपत्र दिल्याविना जॉन्सन यांच्यापुढे आता कोणताही पर्याय राहिला नाही. कोरोना महामारीचे संकट असतांना दळणवळण बंदीच्या काळात कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून जॉन्सन यांनी स्वत:चा वाढदिवस त्यांच्या शासकीय निवासस्थानी चक्क मंत्रीमंडळाच्या बैठक कक्षात साजरा केला. या पार्टीमध्ये जॉन्सन यांचे निकटवर्ती क्रिस पिंचर यांनी मद्यप्राशन करून धिंगाणा घातला होता. याविषयीची वृत्ते वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाली. जनतेवर कडक निर्बंध असतांना निर्बंध लादणाऱ्या प्रमुखाने मात्र जल्लोष करणे, हे जनतेला कधीही रुचणारे नाही. अशी एकच नव्हे, तर अनेक पार्ट्या कोरोना महामारीच्या कालावधीत जॉन्सन यांच्या शासकीय निवासस्थानी झाल्याचे उघड झाले. यामुळे जनतेमध्ये जॉन्सन यांच्याविषयी असंतोष होता. त्यामुळे वर्ष २०१९ मध्ये बहुमताने विजयी झालेल्या या नेत्यावर अवघ्या ३ वर्षांत पायउतार होण्याची वेळी आली. ब्रिटनच्या लोकशाहीतील ही घटना भारतियांना खरोखरच धडा घेण्यासारखी आहे. भारतीय राजकारणात असे कितीतरी राजकारणी आढळतील की, व्यभिचार करूनही ते उजळ माथ्याने ‘लोकनेते’ म्हणून वावरत आहेत. अशांची पाठराखण करणाऱ्यांना पायउतार कोण करणार ? हा प्रश्नच आहे.
असे त्यागपत्र भारतातील राजकारणी देतील का ?
२ वर्षांनंतर कोरोनाच्या काळातील हे प्रकरण मागे पडले असतांनाच जॉन्सन यांनी निकटवर्ती क्रिस पिंचर यांना पक्षाचे ‘डेप्युटी व्हिप’ म्हणून नियुक्त केले. पिंचर यांच्यावर लैंगिक शोषणाचे ६ गुन्हे नोंद आहेत. ‘सेक्स स्कँडल’मध्येही त्यांचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. अशा व्यभिचारी व्यक्तीला पक्षाचे प्रमुख केल्यामुळे जॉन्सन यांच्याविषयीच्या असंतोषाला आणखी धार आली. जॉन्सन यांचे समर्थक मानले जाणारे अर्थमंत्री ऋषी सुनक यांनी ५ जुलै या दिवशी त्यांच्या पदाचे त्यागपत्र दिले. त्यांच्यानंतर आरोग्यमंत्री साजिद जावेद यांनीही त्यागपत्र दिले. अशा प्रकारे तब्बल ४१ खासदारांनी २ दिवसांत स्वत:च्या पदाचे त्यागपत्र देऊन जॉन्सन यांच्या विरोधातील असंतोष प्रकट केला. भारतातील राजकारणात पक्षश्रेष्ठींच्या समाजद्रोही कारवाया ठाऊक असूनही अनेक नेते सत्तेसाठी पदाला चिकटून रहातात. ब्रिटिशांकडून केवळ पेहराव, भाषा हे घेण्यापेक्षा भारतीय राजकारण्यांनी आताच्या घटनेतून त्यांच्याकडून नैतिकता, शिस्त आणि राष्ट्रवाद घेण्यासारखा आहे.
‘विकास’ नव्हे, नैतिकतेला प्राधान्य द्या !
खरे तर भारताची संसदीय कार्यपद्धतीची जडणघडण ब्रिटनच्या संसदीय पद्धतीवरून झाली आहे. त्यामुळे एका अर्थाने भारतातील लोकशाहीचा स्रोत ब्रिटनच आहे. भारतियांनी पाश्चात्त्यांच्या चालीरितींचा झपाट्याने अंगीकार केला; मात्र लोकशाही सुदृढ होण्याच्या दृष्टीने जे घ्यायला हवे, ते मात्र घेतले नाही, हे खेदाने म्हणावेच लागेल. भारतीय राजकारणावर दृष्टीक्षेप टाकला, तर हत्या, व्यभिचार आणि भ्रष्टाचार पचवलेले अनेक नेते सर्व राजकीय पक्षांत आहेत; परंतु राजकीय स्वार्थासाठी त्यांच्यावर कारवाई होत नाही. विकासकामांचे गाजर दाखवले की, नैतिकता गमावलेल्या नेत्यांनाही जनाधार मिळतो. भारतीय राजकारणाचे हे विदारक चित्र आहे. ९५० कोटी रुपयांच्या चारा घोटाळ्याच्या प्रकरणात बिहारचे मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना मुख्यमंत्रीपदाचे त्यागपत्र द्यावे लागले होते; परंतु त्यानंतर त्यांची पत्नी राबडीदेवी यांनी मुख्यमंत्रीपदाचे दायित्व सांभाळले; परंतु लालूप्रसाद यांच्या दावणीला बांधलेल्या त्यांच्या जनता दलाच्या नेत्यांनी याला विरोध दर्शवला नाही. ही कोणती लोकशाही ? एका हत्याकांडात गुन्हेगार ठरलेले झारखंड मुक्ती मोर्च्याचे अध्यक्ष शिबू सोरेन यांना केंद्रीय मंत्रीपदाचे त्यागपत्र द्यावे लागले होते; परंतु त्यानंतरही त्यांनी काही काळ झारखंड राज्याचे मुख्यमंत्रीपद भुषवले. अशी एक ना अनेक उदाहरणे भारतीय राजकारणात पहायला मिळतील.
दांभिकता ओळखायला आणखी किती वर्षे लागणार ?
स्वतंत्र भारतात क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष यांच्या पुण्याईवर काँग्रेसने भारतात ५५ वर्षे राज्य केले. लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, वल्लभभाई पटेल अशा अनेक रत्नांऐवजी काँग्रेसने दगड निवडले. मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी धर्मनिरपेक्षता, सर्वधर्मसमभाव, आरक्षण आदी अनेक सोंगे आणून काँग्रेसने देशातील बहुसंख्य हिंदूंना मूर्ख बनवले. आज इतक्या वर्षांनी काँग्रेसचा खरा चेहरा जनतेसमोर येत आहे. ब्रिटनमध्ये जी दांभिकता काही काळातच लक्षात आली, ती भारतात इतकी वर्षे का आली नाही ? यावर विचार होणे आवश्यक आहे.
पाश्चात्त्य देश भोगवादी असल्यामुळे त्यांच्या विकासाच्या कल्पना या भौतिक विकासापर्यंत सीमीत आहेत. आत्मज्ञानापर्यंत ते पोचू शकत नाहीत; परंतु हे ज्ञान भारतीय संस्कृतीमध्ये आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतीय संस्कृतीचा अवलंब झाला असता, तर भारताची नैतिक अवनती टळली असती. अद्यापही वेळ गेलेली नाही. उठा, सज्ज व्हा ! भारताला हिंदु राष्ट्र करण्यासाठी कामाला लागा !