‘औरंगाबाद’ नामांतराच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे उपोषण !

नामांतराला दोन्ही काँग्रेसचा विरोध !

नामांतराच्या विरोधात उपोषण करतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी

संभाजीनगर – महाविकास आघाडी सरकारने ‘औरंगाबाद’चे ‘संभाजीनगर’ आणि ‘उस्मानाबाद’चे ‘धाराशिव’ नामांतर केल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांमध्ये प्रचंड अप्रसन्नता आहे. काँग्रेसच्या शहराध्यक्षांसह अल्पसंख्यांक आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यागपत्रे दिली आहेत. काँग्रेसच्या मंत्र्यांनी मंत्रीमंडळ बैठकीत या निर्णयाला विरोध न केल्यामुळे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी उघड अप्रसन्नता व्यक्त केली आहे. या प्रकरणी थेट देहली येथे काँग्रेसच्या नेत्या श्रीमती सोनिया गांधी आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याकडे तक्रार करणार आहे, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. ७ जुलै या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नामांतराच्या विरोधात येथे उपोषण केले आहे.

नामांतराला विरोध केल्यास प्रत्युत्तर देऊ ! – प्रदीप जैस्वाल, आमदार

बंडखोर आमदार प्रदीप जैस्वाल म्हणाले की, आमचा कोणताही जात, धर्म आणि समाज यांना विरोध नाही. ‘संभाजीनगर’चे सूत्र अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे आता त्याला विरोध केल्यास प्रत्युत्तर दिले जाईल. बंडखोर आमदार संदीपान भुमरे यांनीही असेच सांगितले. ‘मंत्रीमंडळात उद्धव ठाकरे सरकारने ‘औरंगाबाद’चे ‘संभाजीनगर’ केले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने त्याला मान्यता द्यावी. काँग्रेस आणि ‘एम्.आय.एम्.’ने रस्त्यावर उतरून याला विरोध केल्यास शिवसेनेकडून प्रत्युत्तर दिले जाईल’, अशी चेतावणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि आमदार अंबादास दानवे यांनी दिली.

संपादकीय भूमिका

  • ‘औरंगाबाद’चे ‘संभाजीनगर’ नामांतर करण्याला राष्ट्रवादी काँग्रेसकडून विरोध, हा मुसलमानांचे लांगूलचालन करण्याचा प्रकार नाही का ? औरंगजेबासारख्या आक्रमणकर्त्याविषयी राष्ट्रवादीला एवढा जिव्हाळा का ? असे पक्ष कधीतरी राज्याचे भले करू शकतील का ?

  • क्रूर औरंजेबाचे उदात्तीकरण करण्यासाठी औरंगाबाद नामांतराला विरोध करणारेही त्याच्या वृत्तीचेच म्हणावे लागेल !