कुठे टेनिसला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळवून देणारा इंग्लंड आणि कुठे पारंपरिक खेळांना फाटा देणारे भारतीय !

इंग्लंड देशातील लोकांनी त्यांच्या पारंपरिक टेनिस खेळाला एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे रूप देऊन त्याला एक शान मिळवून दिली. भारतियांनी पाश्चात्त्य खेळांच्या अधिपत्याखाली स्वतःच्या पारंपरिक खेळांकडे दुर्लक्ष केल्याने ते अशा प्रकारे जागतिक प्रसिद्धी मिळवू शकले नाहीत !  ‘विंबल्डन’ ही प्रतिवर्षी जून मासामध्ये उन्हाळा संपण्याच्या काळात चालू होणारी स्पर्धा. या ‘जागतिक शाही सोहळ्या’ला १४५ वर्षांची भव्य-दिव्य अशी परंपरा आहे. जगभरात एका राजेशाही थाट आणि मान राखून असलेले विंबल्डनचे सामने होतात. मोठ्या स्टेडियमध्ये होणारे टेनिसचे सामने पहायला उच्च विद्याभूषित, अभिरुचीसंपन्न क्रीडा रसिक, उंची वस्त्रप्रावरणे आणि दिमाखदार टोपी घालून नागरिक येत असतात. या स्पर्धेचा पुरस्कार सोहळाही अत्यंत शिस्तबद्धतेने, राजशिष्टाचार आणि परंपरा सांभाळून केला जातो. कडक शिस्तीत हे सर्व होत असतांना सुरक्षारक्षक, पोलीस यांची धावपळ होतांना दिसत नाही.

१. ‘लॉन टेनिस’चा इतिहास आणि वैशिष्ट्ये

रबरी चेंडू आणि विणलेल्या रॅकेटच्या साहाय्याने खेळावयाचा एक मैदानी खेळ म्हणून ‘लॉन टेनिस’ (हिरवळीवरील टेनिस) हा खेळ विसाव्या शतकात सर्वत्र लोकप्रिय झाला. या खेळाचे सामने ऑस्ट्रेलिया, फ्रेंच, अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा म्हणूनही होतात. टेनिस खेळाचे मूळ ख्रिस्तपूर्व ५०० मध्ये इराण आणि इजिप्त या देशांमध्ये खेळल्या जाणाऱ्या रबरी चेंडूच्या खेळांमध्ये सापडते. पुढे ग्रीक आणि रोमन साम्राज्यां मध्येही हा खेळ खेळला जात असे. राज परिवारातील लोक हा खेळायला लागल्यापासून त्याला ‘रॉयल टेनिस’ असे नाव पडले. तत्कालीन राजांनी त्याला त्यांच्या प्रांगणात नेल्यामुळे ‘कोर्ट टेनिस’ असे म्हणत. लॉन टेनिसचा खेळ वर्ष १८७४ मध्ये मेजर वॉल्टर विंगफिल्ड यांनी शोधून काढला आणि पुढे तो जगभर लोकप्रिय झाला. या खेळाच्या पहिल्या स्पर्धा लंडनमध्ये विंबल्डन या शहरात झाल्या.

श्री. अनिल साखरे

व्यावसायिकता, उत्तम शारीरिक तंदुरुस्ती (फिटनेस) आणि अधिक तंत्रशुद्धता, तसेच अफाट पैसा, प्रसिद्धी, यश, मानसन्मान, लोकप्रियता मिळवून देणारा एक नतांत सुंदर असा खेळ आहे. व्यवसाय आणि क्रीडा क्षेत्र म्हणूनही तो उत्तम प्रकारे उदयास आला आहे. मार्टिना नवरातिलोव्हा, स्टेफी ग्राफ, सेरेना विल्यम, रॉजर फेडरर, राफेल नादाल, जोकोविक हे आताचे काही जगप्रसिद्ध खेळाडू आहेत. १ वर्षात महत्त्वाच्या ४ स्पर्धा जिंकणारा ‘कॅलेंडर ग्रँडस्लॅम’ असतो आणि कुठल्याही ४ स्पर्धा जिंकणारा ‘करिअर ग्रँडस्लॅम’ हा असतो. स्टेफी ग्राफने ऑलिम्पिकमध्येही पदक मिळवल्याने तिला ‘गोल्डन ग्रॅम ग्रँडस्लॅम’ म्हटले गेले. ज्या खेळाडूंना या फटक्यांच्या अस्त्राचा प्रभावी वापर त्यांच्या तंदुरुस्त शारीरिक क्षमतेने करता येतो, ते विजयाच्या जवळ जातात. या खेळात शरीर लवचिकता आणि उत्कृष्ट पदललित्य महत्त्वाचे ठरते.

आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळालेला टेनिस खेळ

२. शिस्त पाळून खेळला जाणारा खेळ

पांढरा रंग हा इंग्लंडमध्ये उन्हाळ्याचा रंग मानला जातो. स्पर्धेसाठी खेळाडूंना पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावे लागतात. ही स्पर्धा राजघराण्याशी जोडली गेल्यामुळे स्पर्धेच्या नियम, अटी, परंपरा या कसोशीने पाळल्या जातात. या खेळामध्ये कुठल्याही ‘ब्रँड’चा वापर करता येत नाही. अगदी प्यायच्या पाण्याची बाटल्याही बंद खोक्यामध्ये ठेवल्या जातात. एका वर्षी मार्टिना नवरातिलोव्हा यांच्या टी-शर्टवरती ‘किया’ हा शब्द लिहिलेला होता. त्यासाठी सामना थांबवून टी-शर्ट पालटावा लागला. राजघराण्यातील कुणी व्यक्ती स्पर्धेला उपस्थित असतील, तर त्यांना लवून (वाकून) अभिवादन करण्याची परंपरा होती. वर्ष २००३ मध्ये राजा आणि राणी वगळता इतरांना अभिवादन करण्याची परंपरा प्रिन्स विल्यम्स यांनी ही प्रथा बंद केली.

महाराष्ट्रातील पारंपरिक कब्बड्डी खेळ

३. भारतात पारंपरिक खेळाविषयी परिस्थिती

ब्रिटिशांना त्यांच्या परंपरांचा अभिमान असून त्या खेळाला  त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले. याउलट भारतात याच्या विपरित चित्र पहायला मिळते. आपण पाश्चात्त्यांचे खेळ स्वीकारून त्यामध्येच रममाण झालो आहोत. आमच्या देशामध्ये क्रिकेटला एवढे अनन्यसाधारण महत्त्व दिले जात आहे की, त्या खेळामुळे इतर पारंपरिक खेळांना आम्ही मारूनच टाकले आहे. त्यामुळे ‘ऑलिंपिक’सारख्या स्पर्धांमध्येही इतर देश पदकांची कमाई करत असतांना आम्हाला मात्र हाताच्या बोटावर मोजता येतील, एवढीच पदके मिळतात.

स्वातंत्र्यानंतरच्या काँग्रेस सरकारने आपल्या पारंपरिक खेळांना प्रोत्साहन मिळण्यासाठी काहीच केले नाही. पंतप्रधान मोदी यांचे शासन आल्यानंतर कबड्डी, मल्लखांब आदींसारख्या पारंपरिक खेळांना प्रोत्साहन मिळणे, त्याच्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा भरवणे, त्यासाठी ग्रामीण भागातील सक्षम असलेल्या मुलांना प्रोत्साहन देणे असे चालू झाले.

शाळेपासूनच पारंपरिक खेळांना महत्त्व देऊन खेळाडू घडवण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आपल्याकडे कोळी समाजातील मुले पोहण्यात पारंगत असतात; त्यांना पोहण्याचे आधुनिक शिक्षण देऊ शकतो. सातत्याने डोंगरावरती चढ-उतार करणाऱ्या, धावणाऱ्या, शिकारीसाठी धनुष्यबाणाचा वापर करणाऱ्या, झाडावरती वेगाने चढणाऱ्या आदिवासी आणि वनवासी मुलांना मल्लखांब, धनुष्यबाण, धावण्याच्या शर्यती, सायकलिंग, तसेच अन्य प्रकारांचे योग्य प्रशिक्षण दिले, तर ती मुले राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरही पुष्कळ पुढे जाऊ शकतात. पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र या प्रदेशांमध्ये भूमीवरचे दमछाक करणारे खेळ अधिक प्रसिद्ध आहेत. यामध्ये कुस्ती, हॉकी, कबड्डी, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक यात ही मुले चांगले प्राविण्य मिळवू शकतात. नीरज चोप्रा यांनी भालाफेकीमध्ये सुवर्ण पदक मिळवून हे दाखवूनच दिले. अशा रीतीने भारतीय प्रशासनाने पारंपरिक खेळांवर योग्य प्रकारे लक्ष पुरवले आणि त्या दृष्टीने शाळेपासूनच मुलांना प्रशिक्षण दिले, तर या खेळांमध्ये  पुष्कळ चांगले प्राविण्य मिळवून ही मुले भारताचा नावलौकिक वाढवू शकतात. ‘विंबल्डन स्पर्धेचा भारताला हाच संदेश आहे’, असे समजायला हवे !

– अनिल दत्तात्रेय साखरे, कोपरी, ठाणे पूर्व