महाराष्ट्रात विविध ठिकाणी पूरस्थिती !

येत्या ४ दिवसांत कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा यांसह अन्य जिल्ह्यांत अतीवृष्टीची चेतावणी

संग्रहित छायाचित्र

मुंबई – ४ जुलै या दिवशी रात्रभर आणि ५ जुलै या दिवशी सकाळपासून चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रात विविध ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोकणासह कोल्हापूर, अमरावती येथेही पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या (एन्.डी.आर्.एफ.च्या) ९ आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या (एस्.डी.आर्.एफ.च्या) च्या ४ तुकड्या सिद्ध ठेवण्यात आल्या आहेत.

संग्रहित छायाचित्र

अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील चांदूरबाजार आणि मोर्शी येथे पूरजन्य स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम चालू आहे. कोल्हापूरमधील पंचगंगा नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. कराड-चिपळूण येथील कुंभार्ली घाटात दरड कोसळल्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला असून वाहतूक अन्य मार्गाने हलवण्यात आली आहे.