भारताच्या ‘सिंगल यूज प्लास्टिक’वरील बंदीचे जगभरातून स्वागत !

(‘सिंगल यूज प्लास्टिक’ म्हणजे एकदा वापरण्यायोग्य प्लास्टिक)

नवी देहली – भारताने १ जुलैपासून ‘सिंगल यूज प्लास्टिक’च्या वापरावर घातलेल्या बंदीचे जगभरातून स्वागत करण्यात आले. या धाडसी पावलासाठी अनेक देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. देशात एकदा वापरण्यायोग्य प्लास्टिकच्या १९ वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये थर्माकोल प्लेट्स, कप, ग्लास, कटलरी (काटे, चमचे, चाकू), स्ट्रॉ, ट्रे, रॅपिंग फिल्म, निमंत्रण पत्रिका, सिगारेटच्या पाकिटासाठीची फिल्म, प्लास्टिकचे ध्वज, फुग्याच्या काठ्या आणि आईस्क्रीमच्या काठ्या यांचा समावेश आहे.

१. भारतातील डेन्मार्कचे राजदूत फ्रेडी स्वेन म्हणाले की, मला वाटते ही फार मोठी कल्पना आहे. भारताने या प्लास्टिकवर घातलेली बंदी ही पृथ्वीला मिळालेली मोठी देणगी आहे. भारत या दिशेने मोठे योगदान देत आहे; म्हणूनच मी भारताचे अभिनंदन करतो.

२. नॉर्वेचे प्रभारी (तात्पुरते) राजदूत मार्टिन बोथेम यांनी म्हटले की, हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्यासाठी मी भारत आणि पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन करतो. या निर्णयामुळे पृथ्वीला हानी पोचवणार्‍या प्लास्टिकचे प्रमाण अल्प होईल. समुद्रातील प्लास्टिक गोळा करून त्याचा पुनर्वापर करावा लागतो. ते हवेत पसरते आणि आपल्या श्‍वासात विरघळते.

३. नॉर्वेचे भारतातील राजदूत म्हणाले की, ही जागतिक समस्या आहे. भारताला त्याच्या प्रयत्नांत यश मिळायला हवे. प्लास्टिकच्या बाटल्यांसह काही वस्तू अशा आहेत, ज्या भारताच्या बंदीच्या सूचीमध्ये नाहीत.

४. एका अंदाजानुसार भारतात प्रतिदिन दीड लाख टन कचरा निर्माण होतो. त्यापैकी ९ सहस्र ५८९ टन प्लास्टिक कचरा आहे. केवळ ३० टक्के प्लास्टिक असे आहे की, जे पुनर्वापरासाठी त्याच्यावर प्रक्रिया केली जाऊ शकते.

५. जगातील ८० देशांमध्ये एकदाच वापराच्या प्लास्टिकवर बंदी आहे. युरोपमध्ये प्लास्टिक पिशव्या वापरण्यावर स्वतंत्रपणे कर आकारला जातो किंवा शुल्क आकारले जाते.