आजपासून एक्सप्रेस गाड्यांसाठी ‘जनरल तिकिटा’ची सोय उपलब्ध
मिरज, २९ जून (वार्ता.) – सांगली जिल्ह्यातून प्रतिवर्षी वारकरी भाविक मोठ्या प्रमाणात आषाढी यात्रेसाठी पंढरपूर येथे जातात. त्यांची सोय होण्यासाठी ५ ते १४ जुलै या कालावधीत यात्रेसाठी मिरज-पंढरपूर विशेष रेल्वेगाड्यांची सोय करण्यात आली आहे. मिरज येथून पहाटे ५ वाजता, दुपारी १२ वाजून ५५ मिनिटांनी, दुपारी ३ वाजता आणि दुपारी ४ वाजता या गाड्या सुटणार आहेत.
याचसमवेत गेली दोन वर्षे बंद असणारी मिरज-बेळगाव आणि मिरज-लोंढा पॅसेंजर रेल्वेगाडी जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून चालू करण्याचा निर्णय हुबळी विभागाने घेतला आहे. त्यामुळे कर्नाटकातील वारकर्यांनाही आता आषाढी वारीच्या निमित्ताने श्री विठ्ठलाचे दर्शन घेता येणार आहे. आजपासून एक्सप्रेस गाड्यांसाठी ‘जनरल तिकिटा’ची सोयही उपलब्ध झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.