मुंबई, २९ जून (वार्ता.) – कोरोना महामारीच्या कालावधीत अनेक कुटुंबांनी स्थलांतर केल्यामुळे ३ ते १८ वर्षे वयोगटातील असंख्य विद्यार्थ्यांनी शाळा सोडल्याचे शिक्षण विभागाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. या विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून ५ ते २० जुलै या कालावधीत ‘झिरो ड्रॉपआऊट मिशन’ (शाळा सोडून गेलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्याची योजना) राबवण्यात येणार आहे.
नुकत्याच घोषित करण्यात आलेल्या राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणामध्ये कोरोनाच्या २ वर्षांच्या कालावधीत विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी झाल्याचे आढळून आले आहे. ती भरून काढण्यासाठी मागील इयत्तेवर आधारित राज्य सरकारने ‘सेतू’ उजळणीपर अभ्यासक्रमावरही सिद्ध केला आहे. वर्ष २०२२-२३ मध्ये शालेय कामकाजात ३ दिवस आणि २ चाचण्या या स्वरूपात हा अभ्यासक्रम घेण्यात येणार आहे. कोरोनाच्या कालावधीत झालेली विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी भरून काढण्यासाठी वर्ष २०२२-२३ हे ‘शैक्षणिक गुणवत्तावृद्धी वर्ष’ म्हणून राबवले जाणार आहे.
संपादकीय भूमिकामराठीच्या उपयोगासाठी विविध कार्यक्रम घोषित करणार्या सरकारने सर्व शासकीय उपक्रमांची नावे मराठीत ठेवून स्वत:पासून याचा प्रारंभ करावा ! |