अभिनेत्री केतकी चितळे हिच्या विरोधातील २१ गुन्ह्यांमध्ये तिला अटक करणार नाही !

सरकारी अधिवक्त्यांची माहिती

डावीकडून केतकी चितळे आणि शरद पवार

ठाणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी समाजमाध्यमावरून आक्षेपार्ह लिखाण प्रसिद्ध केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे हिच्याविरोधात प्रविष्ट केलेल्या २१ गुन्ह्यांमध्ये तिला अटक करणार नाही, अशी माहिती राज्य सरकारने २७ जून या दिवशी मुंबई उच्च न्यायालयात दिली.

केतकी हिला पोलिसांनी १४ मे या दिवशी अटक केली होती. तिने गुन्हा रहित करण्याच्या मागणीसाठी याचिका प्रविष्ट केली. याचिका प्रलंबित असतांनाच तिने अटकेला आव्हान देणारी याचिका केली. दोन्ही याचिकांवर न्यायमूर्तींच्या खंडपिठासमोर २७ जून या दिवशी सुनावणी झाली. केतकीविरोधात एकूण २२ गुन्हे नोंद असून तिला एकामध्ये जामीन संमत झाला; परंतु ‘तिच्याविरोधातील अन्य गुन्ह्यांत आम्ही तिला अटक करणार नाही’, असे सरकारी अधिवक्त्या अरुणा पै यांनी सांगितले. या प्रकरणाची पुढील सुनावणी १२ जुलै या दिवशी ठेवली.