‘साधना शिबिरा’त आलेल्या अडथळ्यांवर सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी केलेले नामजपादी उपाय

(सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ

२२.६.२०२२

१. एका धर्मप्रचारक संतांना अस्वस्थ वाटत असणे, तसेच जुलाब होत असणे, त्यांच्यासाठी नामजपादी उपाय केल्यावर, तसेच त्यांची दृष्ट काढल्यावर त्यांना पुष्कळ बरे वाटून त्यांचे जुलाबही थांबणे

साधना शिबिरात सहभागी झालेल्या एका धर्मप्रचारक संतांना २२.६.२०२२ या दिवशी सकाळी ९.३० वाजता अस्वस्थ वाटत होते, तसेच जुलाब होत होते. त्यांनी औषध घेतले, तसेच मला त्यांनी उपाय करण्यासही सांगितले. मी ‘एका हाताचा तळवा आज्ञाचक्रावर आणि दुसर्‍या हाताचा तळवा मणिपूरचक्रावर ठेवून ‘महाशून्य’ हा जप करणे’, हे उपाय त्यांच्यासाठी स्वतःवर अर्धा घंटा केले. यामुळे त्यांची अस्वस्थता न्यून झाली. त्यानंतर त्यांची मुठीमध्ये १ लिंबू आणि पाव चमचा काळे तीळ घेऊन दृष्ट काढायला सांगितली. दृष्ट काढून झाल्यावर त्यांना सकाळी ११ वाजता पुष्कळ बरे वाटले आणि त्यांचे जुलाबही थांबले.

२. ध्वनीवर्धक यंत्रणा असूनही व्यासपिठावरून मार्गदर्शन करणार्‍या संतांचा आवाज ऐकू न येणे आणि व्यासपिठावर समोरच्या दिशेने तोंड करून २ खोके लावल्यावर ५ मिनिटांत संतांचा आवाज व्यवस्थित ऐकू येऊ लागणे

दुपारी शिबिरामध्ये व्यासपिठावरून मार्गदर्शन करणार्‍या संतांचा आवाज ध्वनीवर्धक यंत्रणा असूनही ऐकू येत नव्हता. तेव्हा लक्षात आले, ‘व्यासपिठावर बसलेल्यांकडे समोरून त्रासदायक शक्ती प्रक्षेपित होत आहे.’ यावर उपाय म्हणून व्यासपिठावर ‘रिकाम्या खोक्याची उघडी बाजू समोरच्या दिशेने येईल’, असे २ खोके लावण्यास सांगितले. हा उपाय केल्यावर ५ मिनिटांत संतांचा आवाज व्यवस्थित ऐकू येऊ लागला. (‘रिकाम्या खोक्यांद्वारे उपाय कसे करावेत ?’, हे समजण्यासाठी सनातनचा ‘विकार-निर्मूलनासाठी रिकाम्या खोक्यांचे उपाय’ हा ग्रंथ वाचावा.)

३. शिबिरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ४ खोके ‘त्यांची उघडी बाजू वरच्या दिशेने येईल’, असे लावल्यावर शिबिरार्थींना जाणवत असलेल्या त्रासदायक शक्तीच्या दाबाचे प्रमाण अत्यल्प होणे

काही वेळाने शिबिरार्थींना त्रासदायक शक्तीचा दाब जाणवू लागला. मला याविषयी सांगितल्यावर मी शिबिरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ४ रिकामे खोके ‘त्यांची उघडी बाजू वरच्या दिशेने येईल’, असे लावण्यास सांगितले; कारण त्रासदायक शक्तीचा दाब वरच्या दिशेकडून येत होता. तसे खोके लावल्यावर दाबाचे प्रमाण अत्यल्प झाले.


२३.६.२०२२

एका मार्गदर्शक संतांना मळमळत असणे आणि ग्लानी येत असणे, त्यांच्यावरील त्रासदायक शक्तीचे आवरण काढून नामजपादी उपाय केल्यावर त्यांना आधीच्या तुलनेत बरे वाटणे अन् पुन्हा पाऊण घंटा उपाय केल्यावर त्यांना पूर्ण बरे वाटणे

सकाळी ८.४५ वाजता एका मार्गदर्शक संतांनी मला सांगितले, ‘‘मला मळमळत आहे, तसेच ग्लानी येत आहे.’’  मी त्यांना ‘‘तुमच्यासाठी नामजपादी उपाय करतो’’, असे सांगितले. त्यांच्यावर त्रासदायक शक्तीचे आवरण आले होते. प्रथम मी त्यांच्यावरील आवरण काढले आणि मग मी ‘एका हाताचा तळवा आज्ञाचक्रावर आणि दुसर्‍या हाताचा तळवा मणिपूरचक्रावर ठेवणे आणि ‘निर्गुण’ हा नामजप करणे’, हा उपाय त्यांच्यासाठी स्वतःवर एक घंटा केला. उपाय केल्यामुळे त्यांना ग्लानी येऊन झोप लागली आणि त्या दीड घंटा झोपल्या. सकाळी सव्वा अकरा वाजता झोपून उठल्यावर त्यांना आधीच्या तुलनेत बरे वाटत होते; पण अजूनही थोडेसे मळमळत होते आणि २ वेळा जुलाबही झाले. मी त्यांच्यासाठी पुन्हा पाऊण घंटा उपाय केले. त्यानंतर दुपारी १२ वाजता त्यांना बरे वाटू लागले.

दुपारी ३ वाजता एका मार्गदर्शक संतांच्या पोटात पुन्हा दुखू लागले, तसेच त्यांना पुन्हा जुलाब होऊ लागले. मी पुन्हा त्यांच्यासाठी पाऊण घंटा नामजपादी उपाय केले.

एका मार्गदर्शक संतांची दृष्ट काढल्यावर आणि त्यांच्यासाठी अर्धा घंटा नामजपादी उपाय केल्यावर त्यांना पुष्कळ चांगले वाटू लागणे अन् त्यांचे जुलाबही थांबणे

मी सायंकाळी ६.३० वाजता एक मार्गदर्शक संत यांची १ लिंबू आणि पाव चमचा काळे तीळ मुठीमध्ये एकत्र घेऊन दृष्ट काढली. त्यानंतर त्यांना पुष्कळ बरे वाटू लागले; पण त्यांना थोडी अस्वस्थता जाणवत होती. त्याचे कारण शोधल्यावर ‘त्यांचे डोके ते छाती या भागात त्रासदायक शक्तीचे थोडे आवरण आहे’, असे जाणवले. मी ते आवरण काढून त्यांच्यावर अर्धा घंटा उपाय केल्यावर त्यांना पुष्कळ चांगले वाटू लागले आणि त्यांचे जुलाबही थांबले.


२४.६.२०२२

एका मार्गदर्शक संतांसाठी १ घंटा नामजपादी उपाय केल्यावर त्यांची पोटदुखी आणि अंगदुखी दूर होणे : सकाळी ९ वाजता एक मार्गदर्शक संत मला म्हणाल्या, ‘‘माझ्या पोटात थोडे दुखत आहे, तसेच माझे अंगही दुखत आहे.’’ मी आज्ञाचक्र आणि मणिपूरचक्र यांवर १ घंटा उपाय केले. त्यानंतर सकाळी १०.१५ वाजता त्यांना पुष्कळ चांगले वाटू लागले.

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२४.६.२०२२)