तथाकथित सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांना गुजरात पोलिसांच्या आतंकवादविरोधी पथकाने २ दिवसांपूर्वीच मुंबईतून कह्यात घेतले. गुजरात येथे वर्ष २००२ मध्ये झालेल्या दंगलीच्या प्रकरणी सर्वाेच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील आरोप फेटाळले असून ‘एस्.आय.टी.’ने घोषित केलेले त्यांचे निर्दाेषतत्त्व’ ग्राह्य धरले आहे. याच वेळी माननीय सर्वाेच्च न्यायालयाने निष्पाप लोकांना या प्रकरणी अडकवण्यासाठी खोटे पुरावे सिद्ध करणे, प्रकरणाचे राजकीयीकरण करणे, विषय अधिक संवेदनशील बनवणे, कायद्याच्या प्रक्रियेलाच खीळ बसण्यासाठी प्रयत्न करणे यांविषयी संबंधितांची चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. ‘पंतप्रधान मोदी यांचा गुजरात दंगलीत सहभाग असल्याने या प्रकरणाची पुन्हा चौकशी करावी’, अशी याचिका प्रविष्ट करणार्या झाकिया जाफरी यांची पाठराखण करणार्या तिस्ता सेटलवाड आणि गुजरातचे माजी पोलीस महासंचालक श्रीकुमार यांना या प्रकरणी गुजरात पोलिसांनी अटक केली आहे. ‘तिस्ता सेटलवाड यांनी झाकिया जाफरी यांच्या भावनांचा स्वत:च्या लाभासाठी छुप्या पद्धतीने उपयोग केला’, असे ताशेरे न्यायालयाने ओढले आहेत. या प्रकरणातील अन्य एक पोलीस अधिकारी संजीव भट्ट यांच्याविरुद्धही गुजरात पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून त्यांना यापूर्वीच कारागृहात पाठवण्यात आले आहे. या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध मोठे षड्यंत्रच होते’, असे विधान केले आहे.
तिस्ता यांचे (अ)सामाजिक कार्य !
दंगल पीडित आणि अन्य यांसाठी गोळा केलेल्या निधीमध्ये अपहार केल्याच्या प्रकरणीही तिस्ता सेटलवाड यांची चौकशी करण्यात येणार आहे, असे समजते. तिस्ता सेटलवाड ज्या काही तथाकथित सामाजिक कार्याचा डांगोरा पिटतात, तो फोल आहे, हे अनेक वेळा उघड झाले आहे. सेटलवाड यांनी स्थापन केलेल्या न्यासाने परदेशातून कोट्यवधी रुपयांच्या देणग्या जमवल्या आणि त्या अन् त्यांचे नातेवाइक यांनी हे पैसे खासगी कामांसाठी वापरले. गुजरात दंगलींच्या काळात त्यांचे असामाजिक रूप ठळकपणे समोर आले. वर्ष २००२ मध्ये धर्मांधांकडून गोध्रा येथे साबरमती एक्सप्रेसच्या २ डब्यांना बाहेरून कड्या लावून, पेट्रोल ओतून आग लावण्यात आली आणि ५९ निष्पाप रामभक्तांना जिवंत जाळण्यात आले. त्यानंतर गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणात दंगली उसळल्या. यामध्येही सहस्रो लोक मारले गेले. गुजरात राज्यातील वातावरण ढवळून निघाले. गुजरात दंगलीमध्ये काही धर्मांधही मारले गेले. आता येथे संताप आणणारी गोष्ट अशी की, गोध्रा स्थानकाजवळ अत्यंत भीषण आणि अमानवीय पद्धतीने रामभक्तांना जाळण्यात आले, त्याविषयी राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य (?) करणार्या मानवाधिकार अन् सामाजिक संघटना यांनी एका शब्दाने निषेध केला नाही. घटनेनंतर उसळलेल्या दंगलीविषयी मात्र सर्वांनाच चिंता ! का ? कारण रेल्वेच्या डब्यात जळून मरणारे हिंदू होते, तर दंगलीत काही धर्मांध मारले गेले. येथे हिंदू-मुसलमान वाद निर्माण करण्याचा प्रश्न नाही. जी वस्तूस्थिती आहे, ती मान्य करावी लागेल. गोध्रा जळीतकांडाच्या प्रकरणात अनेक धर्मांध आरोपींपैकी पसार झालेल्या अगदी मुख्य सूत्रधाराला काही मासांपूर्वीच अटक करण्यात आली. आग लावून पलायन करणार्यांचे किती पद्धतशीर नियोजन होते ? हे यावरून लक्षात येते.
सामाजिक संघटनांचे दुखणे
चित्र एवढे सुस्पष्ट असतांना तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर मात्र दंगल भडकावण्याचे खापर फोडण्यात आले. याचे कारण काय ? तर मोदी यांची ओळख हिंदुत्वनिष्ठ म्हणून झाली होती. दंगलीच्या प्रकरणी स्थापन केलेल्या एस्.आय.टी. आणि अन्य समित्या यांच्या चौकशांना तत्कालीन मुख्यमंत्री मोदी मोठ्या धैर्याने सामोरे गेले. तेव्हा केंद्रात काँग्रेसचे सरकार होते. काँग्रेस पूर्वीपासून हिंदुत्वनिष्ठ, हिंदु धर्म आणि हिंदू यांच्या विरोधात आहे. अशा वेळी गुजरात दंगल ही अनेक हिंदुविरोधकांसाठी हिंदुत्वनिष्ठांचे दमन करण्यासाठी चालून आलेली नामी संधीच होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर दंगलीचे खापर फोडून त्यांची राज्यात अपकीर्ती व्हावी आणि पुढील निवडणुकीत त्यांचा पराभव व्हावा, यासाठी मोठ्या प्रमाणात छुपे प्रयत्न करण्यात आले. हिंदुद्वेषी पत्रकार, तथाकथित सामाजिक संघटना, विविध चौकशी समित्या आणि तथाकथित सामाजिक संघटना यांना या कामी जुंपण्यात आले. सेटलवाड या याच टोळीमधील एक होत्या; मात्र नरेंद्र मोदी या सर्वांतून तावूनसुलाखून निष्कलंक म्हणून बाहेर पडले. ते गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून २ वेळा निवडून आले आणि देशाचे पंतप्रधानही झाले. हेच या तथाकथित सामाजिक संघटनांचे दुखणे आहे.
अनेक धर्मांधांनी गुन्हे करूनही तिस्ता सेटलवाड यांनी त्यांना पाठीशी घातले, त्यांची बाजू घेतली आणि राष्ट्रप्रेमींच्या विरोधात उभ्या ठाकल्या. खोटे पुरावे, प्रसारमाध्यमांना खोट्या मुलाखती, खोटी विधाने करून स्वत:चा डाव साधता येईल, असे त्यांना वाटत असावे; मात्र सत्य हे कधीतरी बाहेर पडतेच ! गोबेल्स नीतीप्रमाणे असत्याचा प्रसार करणार्यांची पाचावर धारण बसल्याविना रहात नाही. हिंदूंना, हिंदुत्वाला वाईट काळ असतांना अनेक राष्ट्रविरोधी शक्तींनी त्यांचे हात धुवून घेतले. त्याची शिक्षा भोगण्याची वेळ आता आली आहे; कारण आता हिंदू, हिंदुत्व आणि हिंदु राष्ट्र यांना पूरक काळ वेगाने येत आहे. तिस्ता सेटलवाड यांच्यासारख्या दुसर्या तथाकथित सामाजिक कार्यकर्त्या म्हणजे पत्रकार राणा अय्युब ! राणा अय्युब यांच्यावरही कोरोना महामारीच्या काळात देणगीदारांकडून कोरोनाबाधितांसाठी जमवलेल्या निधीचा अपहार केल्याचे गुन्हे नोंद आहेत. देशविरोधी आणि भ्रष्टपणे कार्य करणार्या तथाकथित सामाजिक संघटनांची शासनकर्त्यांनी चौकशी करून त्यांच्यावर बंदी घालणेच आवश्यक आहे. तेव्हाच इतरांवर जरब बसेल.
भ्रष्टाचार आणि दुष्प्रचार करून देशहिताला बाधा आणणार्या तथाकथित सामाजिक संघटनांवर बंदीच हवी ! |