कुडाळ येथील शासकीय भूमीतील अनधिकृत ‘फास्ट फूड स्टॉल’ अखेर हटवला

प्रतिकात्मक चित्र

(‘फास्ट फूड स्टॉल’ म्हणजे झटपट बनवल्या जाणार्‍या अन्नपदार्थांचे दुकान)

कुडाळ – शहरातील जुने जिल्हाधिकारी निवासस्थान असलेल्या शासकीय भूमीत असलेला अनधिकृत ‘फास्ट फूड स्टॉल’ महसूल विभागाने २३ जुलैला कारवाई करून अखेर हटवला.

एका महिलेने हा स्टॉल अनधिकृतपणे चालू केला होता. २० दिवसांपूर्वी महसूल प्रशासनाने या महिलेला स्टॉल हटवून शासकीय भूमी त्वरित रिकामी करण्यासाठी सूचना दिली होती; मात्र सूचना देऊनही संबंधित स्टॉल चालू ठेवण्यात आल्याने कुडाळच्या उपविभागीय अधिकार्‍यांनी २३ जुलैला घटनास्थळाची पहाणी केली आणि पुन्हा त्या महिलेला स्टॉल हटवण्याची सूचना केली. त्यानंतर संबंधित महिलेने स्टॉल हटवून शासकीय भूमी मोकळी करून दिली.

कुडाळ शहरातील या महत्त्वाच्या शासकीय भूमीवर भविष्यात कुडाळ उपविभागीय अधिकारी कार्यालयाची नवीन प्रशासकीय इमारत उभारण्याचा प्रस्ताव आहे. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तसेच महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी शासकीय निवासस्थाने उभारण्याचेही नियोजन आहे. या पार्श्वभूमीवर भविष्यातील शासकीय विकासकामांसाठी आवश्यक असलेली जागा अतिक्रमणमुक्त ठेवणे आवश्यक असल्याने महसूल प्रशासनाने ही कारवाई केली.