‘नीट’ परीक्षेच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका !

मूळ उत्तरपत्रिका सादर करण्याचे खंडपिठाचे आदेश !

बीड – ‘नीट’ (राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा) परीक्षेत अपेक्षेहून अत्यंत अल्प गुण देऊन विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरणार्‍या ‘राष्ट्रीय परीक्षा संस्थे’च्या (नॅट)  प्रशासनाला मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपिठाने नोटीस बजावून आठवड्याच्या आत संबंधित विद्यार्थ्यांच्या मूळ उत्तरपत्रिका न्यायालयात सादर करण्याचे कडक आदेश दिले आहेत.

‘नीट’च्या पुनर्परीक्षेचा निकाल घोषित झाल्यानंतर बीड येथील सोहम गवते या विद्यार्थ्याला मोठा धक्का बसला. ‘अधिकृत आन्सर’ आणि ‘ओ.एम्.आर्.’ शीटनुसार सोहमला ५२२ गुण मिळणे अपेक्षित असतांना प्रत्यक्षात केवळ ९५ गुण देण्यात आले. अशीच भयंकर तफावत दुसर्‍या एका विद्यार्थिनीच्या संदर्भात घडली असून तिला ७०२ गुण मिळण्याची निश्चिती असतांना अवघे ८७ गुण देऊन तिची बोळवण करण्यात आली.  (ओ.एम्.आर्. म्हणजे ऑप्टिकल मार्क रिकग्निशन. स्पर्धा परीक्षांमध्ये (उदा. नीट, एम्.पी.एस्.सी.) उत्तरे नोंदवण्यासाठी विद्यार्थ्याला एका विशेष कागदावर (शीटवर) पेनाने किंवा पेन्सिलने गोल (वर्तुळ) काळे/निळे करावे लागतात. त्याला ‘ओ.एम्.आर्’ शीट असे म्हणतात. ‘अधिकृत आन्सर’ म्हणजे यात कोणत्याही खासगी शिकवणीवर्ग किंवा यू ट्यूब वाहिनीने काढलेल्या संभाव्य उत्तरांचा समावेश नसतो.)

या प्रकारामुळे गवते कुटुंबियांना धक्का बसला आहे. ‘मुलाने आजारी असतांनाही अभ्यास सोडला नाही; पण ‘नॅट’ संस्थेच्या या अनागोंदी कारभारामुळे त्याच्या कष्टाची माती झाली’, अशा शब्दांत मुलाच्या आईने भावान व्यक्त केल्या. याविरोधात अधिवक्ता महेंद्र गंडले यांच्या वतीने खंडपिठात याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे.