माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करावी

सातारा जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे मागणी

प्रतीकात्मक चित्र

सातारा, २३ जुलै (वार्ता.) – माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांचे आर्थिक व्यवहार आणि उत्पन्नाचे स्रोत यांची सक्षम यंत्रणांच्या वतीने सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अंगापूर येथील वैभव गवळी यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनामध्ये म्हटले आहे की, मोरे यांनी विविध शासकीय विभागांशी संबंधित माहिती अधिकाराचे अर्ज नोंदवले आहेत. त्यांनी यातील अनेक प्रकरणांशी संबंधित आंदोलने केली आहेत. यातील काही प्रकरणांचा निकाल अंतिम टप्प्यापर्यंत न जाता ती अन्य मार्गाने निकाली निघाल्याचा संशय आहे. मोरे यांच्या आर्थिक उत्पन्नाचा स्रोत कोणता आहे ? त्यांची एकूण संपत्ती किती आणि कुठे कुठे आहे ? ते करत असलेल्या सर्व आर्थिक व्यवहारांची सक्तवसुली संचालनालयाच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी. तसेच आयकर विभाग, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि अन्य संबंधित यंत्रणांच्या वतीनेही चौकशी करावी. तसेच संबंधित सर्व प्रकरणांची निष्पक्ष फेर चौकशी करून वस्तूस्थिती जनतेसमोर आणावी. या चौकशीमध्ये कोणतीही अनियमितता किंवा गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई करावी. अन्यथा आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा मार्ग मोकळा आहे.