पुणे शहरातील रस्त्यांवर केवळ ५४ खड्डेच !

महापालिकेच्या पथ विभागाचा दावा

प्रतीकात्मक चित्र

पुणे – रस्त्यांवर खड्डे पडल्याच्या तक्रारी आल्यानंतर खड्डे दुरुस्तीसाठी महापालिका तत्पर असून १५ दिवसांमध्ये १ सहस्र १८८ खड्ड्यांपैकी १ सहस्र १३४ खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात आली. शहरात केवळ ५४ खड्डेच शेष आहेत. ते १ ऑगस्टपर्यंत बुजवले जातील, असा दावा पथ विभागाचे प्रमुख राजेश बनकर यांनी केला. महापालिकेने ७ ते २१ जुलै या काळात ‘कोल्ड मिक्स बॅग’द्वारे ६३४ चौरस मीटर, ‘हॉटमिक्स’द्वारे २ सहस्र ८८ चौरस मीटर डांबरीकरण केले. रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी १६२ ठिकाणी पाण्याचा निचरा केला. ‘पेव्हिंग ब्लॉक्स’च्या माध्यमांतून ६२ चौरस मीटर क्षेत्रातील दुरुस्ती केली. ८५७ चौरस मीटर क्षेत्रात मुरुम, जी.एस्.बी. साहित्याचा वापर केल्याचे सांगितले.

महापालिकेने रस्त्यांवरील खड्डे बुजवले जात असल्याचा दावा केला असला, तरी शहरातील प्रमुख रस्ते आणि चौक यांमध्ये असंख्य वाहनचालकांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागतो. अनेक ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजवले, तरी ते २-३ दिवसांत पुन्हा उखडत असल्याच्या तक्रारी आहेत. (याविषयी महापालिकेला काय म्हणायचे आहे ? – संपादक) रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची तक्रार करण्यासाठी सिद्ध केलेले ‘पी.एम्.सी. रोडमित्र अ‍ॅप’ हे सध्या बंद पडलेले आहे. त्यामुळे खड्ड्यांच्या तक्रारी देण्यासाठी नागरिकांना महापालिकेच्या कार्यालयामध्ये हेलपाटे घालावे लागत आहेत.