Dr. Anand Ranganathan : ‘उपोषण म्हणजे अराजकता’, हे डॉ. आंबेडकरांचे वक्तव्य, ही सोनम वांगचुक यांना चपराक !

देहलीत चालू असलेल्या कथित विद्यार्थी आंदोलनाच्या प्रकरणी लेखक डॉ. आनंद रंगनाथन् यांनी ओढले आसूड !

नवी देहली –  कॉकरोच जनता पक्षाच्या आंदोलनाचे प्रकरण तीन किंवा चार गोष्टींचे मिश्रण आहे. जंतरमंतर आंदोलन, तसेच सोनम वांगचुक यांच्या उपोषणाच्या संदर्भात ज्या राज्यघटनेचा दाखला देऊन ज्यांच्या विचारांचा डंका वाजवला जात आहे, त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समजून घेतले पाहिजेत. ते म्हणाले होते, ‘‘जर आपल्याला लोकशाही केवळ नावानेच नाही, तर प्रत्यक्षात टिकवायची असेल, तर आपण काय केले पाहिजे ? माझ्या मते आपण पहिली गोष्ट केली पाहिजे, ती म्हणजे आपली सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी घटनात्मक मार्गांना घट्ट धरून ठेवणे होय. याचा अर्थ आपण क्रांतीचे हिंसक मार्ग सोडले पाहिजेत. याचा अर्थ असा की, आपण सविनय कायदेभंग, असहकार आणि सत्याग्रहाचा मार्ग सोडून दिला पाहिजे. हे (उपोषणासारखे मार्ग) दुसरे काही नसून अराजकतेचे व्याकरण आहे आणि ते जितक्या लवकर सोडले जाईल, तितके आपल्यासाठी चांगले’, असे महत्त्वपूर्ण वक्तव्य प्रसिद्ध लेखक आणि वैज्ञानिक डॉ. आनंद रंगनाथन् यांनी केले. ते एका वाहिनीला ‘कॉकरोच जनता पक्षा’कडून चालू असलेले आंदोलन आणि संबंधित घडामोडींवर बोलत होते.

डॉ. रंगनाथन् पुढे म्हणाले की, २५ नोव्हेंबर १९४९ च्या संविधान सभेत डॉ. आंबेडकर यांनी या ऐतिहासिक भाषणात पुढे म्हटले होते की, उपोषणे हा एक प्रकारचा नैतिक ‘ब्लॅकमेल’ आणि दबाव असतो. ते विरोधकाला अशक्य परिस्थितीत टाकतात, ते म्हणजे ‘एकतर माघार घ्या किंवा एखाद्याच्या मृत्यूचे दायित्व स्वीकारा.’ स्वतंत्र भारतात असे मार्ग विधीमंडळ, निवडणुका आणि न्यायव्यवस्था यांना बगल देतात. जर प्रत्येक गटाने आपल्या मागण्यांसाठी उपोषण किंवा सत्याग्रह यांचा मार्ग अवलंबला, तर लोकशाही नावाला उरली, तरी अराजकता निर्माण होईल. लोकशाही संस्था कमकुवत होतील आणि हुकूमशाहीचा धोका निर्माण होईल. भारताला आंदोलनांच्या लोकप्रिय किंवा भावनिक पद्धतींपेक्षा घटनात्मक नैतिकता, राज्यघटना आणि त्याच्या प्रक्रियेविषयी आदराची आवश्यकता आहे. त्याऐवजी राजकीय आणि घटनात्मक मार्गांनी पाठपुरावा केला पाहिजे, शिक्षण दिले पाहिजे, आंदोलन अन् संघटन केले पाहिजे.

डॉ. रंगनाथन् यांनी मांडलेली महत्त्वपूर्ण सूत्रे

१. कुणीच नेता परिपूर्ण नाही, किती जणांचे त्यागपत्र मागणार ?

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे त्यागपत्र मागितले जात आहे. प्रत्यक्षात मी तुम्हाला एक सूची देऊ शकतो. या देशात ५४३ खासदार आहेत, केंद्रात ७० कॅबिनेट मंत्री आहेत आणि राज्यांमध्ये किती आहेत कुणास ठाऊक. प्रत्येक जण परिपूर्ण असण्यापासून पुष्कळ दूर आहे. मी तर म्हणीन की, राजकारणी असल्यामुळे प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या प्रकारे तडजोड करतो, जे काम करायला हवे, ते करत नाहीत. त्यामुळे जर तुम्ही त्यागपत्र मागायला लागला, तर ही सूची इतकी लांब आहे की, तुम्ही थांबवू शकणार नाही.

२. प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी केंद्र सरकारने दायित्व घ्यायला हवे होते !

नीट प्रश्नपत्रिका फुटल्याच्या दिवशीच सरकारने त्याचे दायित्व घ्यायला हवे होते. त्याचे उत्तरदायित्व निश्चित केले पाहिजे होते. एवढेच नाही, तर सरकारने गरीब मुलांना ५ ते १० सहस्र रुपये आर्थिक भरपाई द्यायला हवी होती. हे मी तेव्हाच म्हणालो होतो. प्रश्नपत्रिका फुटली, २३ लाख विद्यार्थी होरपळले. अनेक गरीब मुलांनी आत्महत्या केल्या ? त्याचे दायित्व कुठे आहे ? शिक्षणमंत्र्यांच्या त्यागपत्राची मागणी योग्य आहे.

३. आंदोलक सर्वाेच्च न्यायालयाच्या निष्क्रीयतेचा निषेध का करत नाहीत ?

आंदोलक चुकीच्या घटनात्मक संस्थेला (सरकारला) विरोध करत आहेत. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निष्क्रीयतेचा निषेध केला पाहिजे. केवळ सर्वोच्च न्यायालयच सरकारला प्रत्येक विद्यार्थ्याला भरपाई देण्याचे, संबंधितांना बडतर्फ करण्याचे आणि उत्तम व्यवस्था निर्माण करण्याचे आदेश देऊ शकते.

४. सरकारसाठी हे लाजिरवाणी !

प्रश्नपत्रिका फुटीच्या दिवशी मी म्हणालो होतो की, ‘नीट’ परीक्षेसाठी २३ लाख प्रश्नपत्रिका आधीच छापून ठेवण्याला काही अर्थ नाही, कारण त्यामुळे प्रश्नपत्रिका फुटण्याची शक्यता निर्माण होते. तुम्ही म्हणत आहात की, पुढच्या वर्षापासून ते डिजिटल कराल, मग आधी तुम्ही झोपला होता का ? १५ लाख विद्यार्थी ‘जेईई मेन्स’ (‘जॉईंट एन्ट्रेन्स एक्झाम मेन्स’ अर्थात् अभियांत्रिकी प्रवेशासाठीची) परीक्षा देतात. ती छापलेल्या प्रश्नपत्रिकेद्वारे होत नाही, ती संगणकीकृत असते. जेव्हा १५ लाख लोक ते करू शकतात, तर २० लाख लोकही करू शकतात. पंतप्रधानांनी ‘अभिनंदन ! तुम्ही ‘नीट’ पुन्हा आयोजित केली’, असे म्हणणे ही शोकांतिका आहे. हे घडणे हीच लाजीरवाणी बाब होती, हे आपण का लक्षात घेत नाही ?

५. अभिजीत दीपके हे अरविंद केजरीवाल यांची, तर सोनम वांगचुक अण्णा हजारे यांची भूमिका निभावत आहेत !

वर्ष २०११ मध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधात ज्या प्रकारे अरविंद केजरीवाल आणि अण्णा हजारे यांनी आंदोलन उभारले होते, त्या स्वरूपाचे आंदोलन आज उभे करण्यात आले आहे. ‘कॉकरोच जनता पक्षा’चे प्रमुख अभिजीत दीपके हे अरविंद केजरीवाल आहेत आणि उपोषणासाठी बसलेले सोनम वांगचूक हे अण्णा हजारे यांची भूमिका निभावत आहेत.

संपादकीय भूमिका

ज्या घटनाकार डॉ. आंबेडकर यांच्या नावाचा उदो उदो करून आंदोलनाद्वारे राज्यघटनेचा दाखला दिला जात आहे, त्या आंबडेकरांनी स्वत:च उपोषण हे शस्त्र स्वतंत्र भारतात आवश्यक नाही, असे स्पष्ट करतांना त्यास ‘अराजकाचे व्याकरण’ संबोधले होते. डॉ. रंगनाथन् यांनी करून दिलेले हे स्मरण म्हणजे स्वतःला डॉ. आंबेडकर यांचे अनुयायी संबोधणार्‍या आंदोलनकर्त्यांचे बेगडी आंबडेकरी प्रेम दर्शवते, असेच आता म्हटले पाहिजे !