टाकळी (सांगली) येथे वाढीव वर्गणी देऊनही भेडसावणार्‍या तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त !

ग्रामसेवक व्ही.टी. नागरगोजे यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ

मिरज, २३ जुलै (वार्ता.) – येथील टाकळी या गावात (सांगली जिल्हा) पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. पिण्याच्या पाण्यासाठी वार्षिक वर्गणी प्रत्येकी २ सहस्र ४०० रुपये भरलेली असूनही महिन्यातून केवळ २-३ वेळाच गावांमध्ये पाणी येते. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या संदर्भात ‘हिंदु एकता आंदोलना’चे उपाध्यक्ष विकास पाटील, अध्यक्ष राम भोसले, भाजपचे तालुका उपाध्यक्ष विशाल बनसोडे, भोपाळ गुळवणी, दिनगोंडा पाटील आणि अन्य सदस्य यांनी पंचायत समितीच्या सदस्या सौ. रिदा मुजावर आणि ग्रामसेवक श्री.व्ही.टी. नागरगोजे यांना निवेदन सादर केले.

यापूर्वीही तहसीलदार,जिल्हाधिकारी आणि पंचायत समिती कार्यालयांत अनेक वेळा गावातील अस्वच्छता, घंटागाड्यांची समस्या, पिण्याच्या पाण्याची समस्या, सार्वजनिक हिंदु स्मशानभूमीची समस्या यांसह सार्वजनिक मुतारी उपलब्ध करून देण्याविषयी निवेदने देण्यात आली आहेत. टाकळी गावामध्ये अठरापगड जातीचे हिंदु समाजाचे बांधव असूनसुद्धा गेली

अनेक वर्षे हिंदूंसाठी सार्वजनिक स्मशानभूमी उपलब्ध करून देण्यात प्रशासन अयशस्वी ठरले आहे. (हे प्रशासनासाठी लज्जास्पद ! – संपादक) ग्रामस्थांनी या सर्व समस्यांसाठी आंदोलनही केले होते.

‘हिंदु एकता आंदोलन’ आणि ‘समस्त हिंदुत्वनिष्ठ परिवारा’च्या वतीने प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केल्यामुळे विद्यार्थी आणि नागरिक यांसाठी ग्रामीण बस वेळोवेळी उपलब्ध झाली आहे. टाकळी गावातील सर्व माता-भगिनी महिला वर्गाच्या वतीने नुकतेच दिलेल्या निवेदनात ‘२४ घंटे पाणीपुरवठा करा, अन्यथा आंदोलन तीव्र करू’, अशी चेतावणी देण्यात आली आहे. पंचायत समिती सदस्या रिदा मुजावर आणि ग्रामसेवक व्ही.टी. नागरगोजे यांनी थातूरमातूर उत्तरे देऊन टोलवाटोलवी केली.

नागरिकांची प्रशासनाकडे मागणी

पंचायत समिती सदस्या रिदा मुजावर यांना निवेदन सादर करतांना टाकळी (बोलवाड) येथील संघटना आणि पक्षांचे पदाधिकारी अन् ग्रामस्थ

आजपर्यंत दिलेल्या निवेदनातून पाणीपुरवठा नियमित करणे, वाढीव आणि अवाजवी देयक अल्प करणे, मुतारी आणि स्मशानभूमीचा प्रश्न सोडवण्यासाठी, तसेच खोटी माहिती थांबवण्यासाठी प्रशासन आणि ग्रामपंचायत यांना अधिकृत लेखी माहिती देण्याची मागणी केली आहे. उन्हाळ्यात, तसेच पावसाअभावी तीव्र पाणीटंचाईचा प्रश्न ऐरणीवर आल्याने प्रशासन यावर काय तोडगा काढणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.