उसप गावातील प्रस्तावित दगड खाण आणि क्रशर प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध

विशेष ग्रामसभेत सर्वानुमते घेण्यात आला ठराव

प्रतिकात्मक चित्र

(क्रशर म्हणजे मोठ्या दगडांचे लहान तुकडे करणारे यंत्र)

दोडामार्ग (जिल्हा सिंधुदुर्ग) – तालुक्यातील उसप ग्रामस्थांनी गावाचे पर्यावरण, जलस्रोत आणि शेती यांच्या संरक्षणासाठी एकजुटीने निर्धार व्यक्त करून प्रस्तावित दगड खाण आणि क्रशर प्रकल्पाला एकमुखी विरोध दर्शवला आहे. याविषयीचा ठराव उसप ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या विशेष ग्रामसभेत एकमताने संमत करण्यात आला.

ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या या ग्रामसभेस सरपंच सौ. रूचिता गवस आणि उपसरपंच दाजी नाईक, तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्यांसह सुमारे १४० ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी प्रस्तावित प्रकल्पामुळे गावातील जलस्रोत, शेती, फळबागा, पर्यावरण, जैवविविधता, तसेच ग्रामस्थांच्या आरोग्यावर होणार्‍या संभाव्य परिणामांवर सविस्तर चर्चा झाली. ‘भावी पिढ्यांचे हित आणि गावाचा नैसर्गिक समतोल अबाधित राखण्यासाठी हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत उसपमध्ये होऊ देणार नाही’, अशी ठाम भूमिका ग्रामसभेत मांडण्यात आली.