‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !

नवी मुंबई – नवी मुंबई महानगरपालिकेने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये इंग्रजी बालवाड्या (किंडरगार्डन) चालू करून महाराष्ट्रद्रोह केला आहे. या बालवाड्या तातडीने बंद केल्या नाहीत, तर ‘मराठी अभ्यास केंद्र’ जनआंदोलन करील, अशी चेतावणी केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांनी २२ जुलै या दिवशी वाशी येथील बैठकीत दिली. या वेळी मनसेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष गजानन काळे, मनसे नगरसेवक अभिजित देसाई, उद्योजक आणि मनसेचे नवी मुंबईचे समन्वयक संजय डाकवे आदी उपस्थित होते.

कुणाच्या आर्थिक लाभासाठी पुढच्या पिढीची वाट लावत आहात ?

‘मोठा गाजावाजा करून आणि विज्ञापने करून नवी मुंबई महापालिकेने इंग्रजी बालवाड्या चालू करण्याचा निर्णय घेतला. प्रत्यक्षात मात्र तिथे केवळ १०० च्या आसपास मुलांची नोंदणी झाली आहे. एरवी ‘मराठी माध्यमाच्या शाळा का नको ?’ असे विचारल्यावर सांगतांना ‘मागणी नाही’ असे कारण प्रशासन पुढे करते. मग इंग्रजी माध्यमाच्या बालवाड्यांना मागणी नसेल, तर त्याचा रेटा कुणाच्या लाभासाठी लावला जात आहे ? यामध्ये कुणाचे आर्थिक हितसंबंध गुंतले आहेत ? हेसुद्धा नागरिकांना कळले पाहिजे. अल्पकालीन आर्थिक हितासाठी भाषेची आणि ती बोलणार्‍या पिढीची हानी करणे, हा भाषाद्रोह आहे. सुबक नाव असले तरी बालकांची ‘वाट’ लावणार्‍या या बालवाड्या आहेत. समाजात त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटेल’, अशी चर्चा या वेळी झालेल्या सभेत झाली.


कुणीही मागणी केलेली नसतांना इंग्रजी बालवाड्या चालू करण्यात आलेल्या आहेत. केवळ २ दिवसांचे प्रशिक्षण देऊन यामध्ये शिक्षक शिकवत आहेत. तसेच नवी मुंबई महानगरपालिकेने ‘आकांक्षा’ नावाच्या संस्थेला १० वर्षांच्या करारावर पालिकेची १ शाळा चालवण्यासाठी ३४ कोटी रुपये दिले आहेत. अशा काही शाळा या संस्थेला देऊन पालिका जनतेच्या पैशांचा चुराडा करत आहे.

– गजानन काळे, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष, मनसे


आपण सभागृहात इंग्रजी बालवाड्यांना आरंभापासून विरोध केला आहे. ऑगस्ट मासाच्या होणार्‍या महासभेत मराठी अभ्यास केंद्र आणि सर्व राजकीय पक्ष यांचे कार्यकर्ते एकत्रित येऊन नगरसेवकांशी संवाद साधणे आवश्यक आहे.

– अभिजित देसाई, नगरसेवक, मनसे

संपादकीय भूमिका

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, राज्याची भाषा सल्लागार समिती, जगभरातील अभ्यासक मातृभाषेतील शिक्षणाचा आग्रह धरत असतांना नवी मुंबई महानगरपालिकेला इंग्रजी बालवाड्या चालू करून काय साध्य करायचे आहे ?, अशी टीका मराठी अभ्यास केंद्राचे डॉ. दीपक पवार यांनी या वेळी केली.