मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त

पालघर – मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणार्‍या वाहनाचा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि मनोर पोलीस यांनी पाठलाग करून दीड टन गोमांस पकडले. या वेळी पोलिसांनी तस्करीसाठी वापरलेली ‘इनोव्हा’ चारचाकी जप्त केली आहे. आरोपींनी वाहन गायकवाड डोंगरी परिसरात सोडून अंधाराचा अपलाभ घेत पलायन केले. (बर्‍याच घटनांत गोमांस तस्करी करणारे वाहन पकडल्यावर संबंधित पलायन करतात, हे संशय निर्माण करण्यास जागा ठेवते ! – संपादक)

महामार्गावरून गोमांसाची तस्करी होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी संयुक्तपणे सापळा रचला. पहाटे संशयास्पद इनोव्हा गाडी दिसताच पोलिसांनी तिचा पाठलाग केला. काही अंतरानंतर चालकाने गायकवाड डोंगरी परिसरात वाहन सोडून पळ काढला. (पाठलाग करणारे पोलीस तस्करांना वाहनातून उतरून पकडू न शकणे, हे लज्जास्पद ! – संपादक) संतप्त ग्रामस्थांनी वाहनाच्या काचा फोडल्याची माहिती आहे. जप्त मांसाचे नमुने पशूवैद्यकीय विभागाकडे पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका

गोतस्करांच्या टोळ्यांना पोलीस चाप कधी लावणार ? महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतांनाही उघडपणे गोहत्या होत आहेत, हे संतापजनक आहे !