‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार

  • पर्यटन खात्याच्या वतीने आध्यात्मिक पर्यटनाला चालना 

  • गोव्यातील ११ ऐतिहासिक मंदिरांना जोडणारी ३ दिवसांची यात्रा

हरी मंदिर मडगाव

पणजी, २३ जुलै (वार्ता.) – गोव्यातील पर्यटन खात्याच्या ‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा २४ जुलैपासून खांडोळा येथील श्री महागणपति मंदिरापासून शुभारंभ होत आहे. गोव्याच्या समृद्ध आध्यात्मिक वारशाची ओळख करून देणे आणि समुद्रकिनार्‍यांपलीकडील गोव्याचे सांस्कृतिक अन् धार्मिक वैभव पर्यटकांसमोर मांडणे या उद्देशाने पर्यटन खाते हा उपक्रम राबवत आहे.

काय आहे ‘एकादश तीर्थयात्रा’ योजना ?

पर्यटन खात्याने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार ‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेच्या अंतर्गत यात्रेकरूंना राज्यातील ११ ऐतिहासिक मंदिरांचे दर्शन घेता येणार आहे. याद्वारे यात्रेकरूंना गोव्यातील समृद्ध आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाचा अनुभव घेता येणार आहे. या यात्रेसाठी २ विशेष बसगाड्यांचा वापर करण्यात येणार आहे. याद्वारे यात्रेकरू आरामदायी आणि सुलभ प्रवास करू शकणार आहेत. मंदिर दर्शनासमवेतच मार्गावरील नैसर्गिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्थळांचाही अनुभव पर्यटकांना घेता येणार आहे.

खांडोळा येथील महागणपती मंदिर

३ दिवसांचा कार्यक्रम

पहिला दिवस : श्री महागणपति मंदिर, खांडोळा; श्री देवकीकृष्ण मंदिर, माशेल; श्री अनंत मंदिर, सावई-वेरे आणि श्री महादेव मंदिर, तांबडी सुर्ला

दुसरा दिवस : श्री ब्रह्मदेव मंदिर, ब्रह्मा करमळी (वाळपई); श्री संस्थान दत्तवाडी, सांखळी आणि श्री सप्तकोटेश्वर मंदिर, नार्वे

तिसरा दिवस : श्री परशुराम मंदिर, पैंगीण, काणकोण; श्री शांतादुर्गा कुंकळीकरीण मंदिर, फातर्पा; श्री दामोदर मंदिर, जांबावली आणि श्री हरि मंदिर, मडगाव

‘एकादश तीर्थयात्रे’मुळे गोव्याच्या आध्यात्मिक आत्म्याचा अनुभव यात्रेकरूंना येईल ! – रोहन खंवटे, पर्यटनमंत्री

याविषयी पर्यटनमंत्री रोहन खंवटे म्हणाले, ‘‘गोव्याची ओळख केवळ समुद्रकिनार्‍यांमुळे नसून शतकानुशतके जपलेली मंदिर परंपरा आणि आध्यात्मिक वारसा यांच्याशीही जोडलेली आहे. ही यात्रा शाश्वत आणि संस्कृतीकेंद्रित पर्यटनाला चालना देत गोव्याच्या आध्यात्मिक आत्म्याचा अनुभव पर्यटकांना देणार आहे.’’