खोलीतील सौम्य प्रकाशामुळेही होते झोपमोड ! – वैज्ञानिकांचे संशोधन

झोपमोडीमुळे वयस्करांना लठ्ठपणा आणि उच्च रक्तदाब यांचा धोका !

शिकागो (अमेरिका) – येथील ‘नॉर्थवेस्टर्न विद्यापिठा’तील ‘फीनबर्ग स्कूल ऑफ मेडिसिन’कडून नुकतेच एक संशोधन करण्यात आले. संशोधनातून असे निष्पन्न झाले की, झोपेच्या खोलीत सौम्य प्रकाशामुळेही झोपमोड होऊ शकते. त्यामुळे अपुर्‍या झोपेची समस्या नेहमी जाणवू लागते. यातून वयस्करांमध्ये आरोग्यविषयक गंभीर समस्या निर्माण होतात. ५३ टक्के वयस्करांमध्ये मधुमेह, लठ्ठपणा आणि उच्च रक्तदाब यांचा धोका वाढतो.

१. संशोधन करणार्‍या गटातील प्रा. फिलिस जी. म्हणाले, ‘‘निद्रानाशाचा त्रास जाणवल्यास झोपेच्या खोलीतील प्रकाश बंद करावा.’’
२. दुसरीकडे गटातील डॉ. मिंजी किम म्हणाल्या की, झोपलेल्या व्यक्तीवर प्रकाश पडला, तर शारिरिक समस्या उद्भवतात, हे सिद्ध झालेले नाही; परंतु त्यांचा संबंध असू शकतो.
३. संशोधकांनी ६३ ते ८४ वर्षे वयोगटातील ५५२ पुरुष आणि महिला यांना एक ‘अ‍ॅक्टिग्राफ’ (झोपेच्या तीव्रतेचे मापन करणारा हातातील ‘बँड’च्या स्वरूपातील ‘सेन्सर’ म्हणजेच यंत्र) दिला. त्यानंतर झोप आणि दिनचर्या यांची तुलना करण्यात आली.
४. वास्तविक झोपेच्या वेळी कोणत्याही वयोगटातील व्यक्तीने प्रकाशापासून दूरच राहिले पाहिजे, असे संशोधकांनी म्हटले आहे.
५. संशोधनाच्या अंतर्गत २० वर्षीय व्यक्तीच्या झोपेवर प्रकाशाचा परिणाम याचाही अभ्यास करण्यात आला. सौम्य प्रकाश डोळ्यावर पडताच संशोधनात सहभागी तरुणांची झोपमोड झाली. त्यात तरुण पुन्हा झोपले; परंतु पूर्ण झोप होऊ शकली नाही, अशी तक्रार त्यांनी केली.

झोपेच्या खोलीत भ्रमणभाष भारित करणे टाळावे !

झोपमोड होऊ नये, यासाठी प्रत्येक प्रकारच्या जोखमीपासून स्वत:चा बचाव करायला हवा. यासाठी झोपेच्या खोलीत भ्रमणभाष, भ्रमणसंगणक भारित (चार्जिंग) करू नये, असेही संशोधकांनी म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

वैज्ञानिक संशोधनातील निष्कर्ष पाहून संपूर्ण अंधार करून झोपण्याचा प्रकार समाजात रूढ होऊ शकतो; परंतु अध्यात्मशास्त्रानुसार अंधारात झोपल्याने सूक्ष्मातील वाईट शक्ती मनुष्यावर आक्रमण करण्याचा धोका संभवतो. यासाठी हिंदु धर्मात सांगितल्यानुसार झोपतांना तूप अथवा तेल यांचा दिवा बारीक तेवत ठेवावा. या दिव्याच्या प्रकाशाचा झोपतांना डोळ्यांना त्रासही होत नसल्याने यातून धर्माच्या शिकवणीचे परिपूर्णत्वही लक्षात येते !