विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी २८५ आमदारांचे मतदान

मुंबई – विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जून या दिवशी झालेल्या निवडणुकीत विधान परिषदेसाठी २८५ आमदारांनी मतदान केले होते. निकाल घोषित होण्यापूर्वी शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या.

मतदानावरील काँग्रेसचा आक्षेप निवडणूक आयोगाने फेटाळला !

भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि सौ. मुक्ता टिळक यांच्या मतदानावर काँग्रेसकडून आक्षेप घेण्यात आला होता. ‘त्यांच्या मतदानाच्या वेळी २ सहकारी उपस्थित होते’, असा आरोप करत काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी ‘दोन्ही मते रहित करावीत’, अशी मागणी केली आहे. ‘काँग्रेसच्या आक्षेपाला अर्थ नाही’, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली, तर अनुमती घेऊनच टिळक आणि जगताप यांनी मतदान प्रकियेत साहाय्य घेतले, असा दावाही त्यांनी केला; मात्र काँग्रेसचा आक्षेप राज्य निवडणूक आयोगाने फेटाळला आहे.

काँग्रेसची असंवेदनशीलतेची परिसीमा ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

भाजपचे दोन्ही आमदार आजारी आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या हातून मतपत्रिका पेटीत टाकली. काँग्रेसने आमदार सौ. मुक्ता टिळक आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मतदानावर आक्षेप घेतला आहे. ही असंवेदनशीलतेचा परिसीमा आहे.

नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली !

राज्याचे अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना विधान परिषद निवडणुकीसाठी सर्वोच्च न्यायालयाने २० जून या दिवशी अनुमती नाकारली. मलिक आणि देशमुख यांच्या मतदान करण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. ‘मतदान करण्यासाठी मुभा द्यावी’, अशी मागणी मलिक आणि देशमुख यांच्या अधिवक्त्यांच्या द्वारे न्यायालयात करण्यात आली होती.