पुणे महापालिकेच्या अयोग्य वापर होणाऱ्या वास्तूंची पडताळणी होणार !

पुणे – महापालिकेने कोट्यवधी रुपये व्यय करून बांधलेल्या इमारती, खेळाची मैदाने, सांस्कृतिक केंद्रे, क्रीडा संकुल, योगा भवन अशा विविध वास्तूंचा अयोग्य वापर होत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे येत आहेत. या संदर्भात प्रशासनाने नियमावली सिद्ध केली आहे. या मालमत्तांचा योग्य वापर केला जात आहे का ? याची पडताळणी करून बांधण्यात आलेल्या, वापर चालू असलेल्या आणि विनावापर पडून असलेल्या मालमत्तांची माहिती ३० जूनपर्यंत सादर करावी, अशा सूचना महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी संबंधित क्षेत्रीय कार्यालयांच्या प्रमुखांना दिल्या आहेत.

प्रशासनाने त्वरित चौकशी केली असता महापालिकेच्या ५७ मालमत्ता या ‘हरवल्या’ असल्याचे अहवाल समोर आले. (वास्तू हरवायला त्यांना काय पाय फुटले कि पंख फुटले ? या संदर्भात झालेला गैरव्यवहार जनतेसमोर आला पाहिजे; कारण महापालिकेच्या वास्तू या अंतिमतः जनतेच्या कराच्या पैशांतूनच बांधण्यात आलेल्या असतात ! – संपादक) त्यांतील काही मालमत्तांचा परस्पर वापर करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. मालमत्ता व्यवस्थापन विभागाने त्यांच्या कह्यातील मालमत्तांची छाननी करून माहिती संकलित केली आहे.

ज्या मालमत्तांचा कराराचा कालावधी पूर्ण झाला आहे, अशांचे नव्याने करार करणे चालू आहे. ज्या मालमत्तांचा कालावधी संपला नाही; मात्र त्यांच्याकडे भाड्यापोटी थकबाकी आहे, अशा ९६ मालमत्ता (दुकाने किंवा गाळे) शासनाधीन केल्याचे मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे प्रमुख राजेंद्र मुठे यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका 

केवळ वापर होत आहे किंवा विनावापर आहेत, याची पडताळणी करून काय होणार ? त्या वास्तूंचा अयोग्य पद्धतीने, म्हणजे गैरवापर होत असल्याची पडताळणी होणे आवश्यक आहे. जर महापालिकेकडे तशा तक्रारी आल्या आहेत, तर त्या अनुषंगाने योग्य ती सुरक्षाव्यवस्था ठेवून आणि पोलिसांचे साहाय्य घेऊन त्यावर उपाययोजना शोधल्या पाहिजेत आणि संबंधितांना दंड केला पाहिजे !