परात्पर गुरु डॉ. आठवले रथोत्सवाच्या वेळी परिधान करणार असलेल्या वस्त्रांना इस्त्री करण्याची सेवा करतांना आलेल्या अनुभूती

सप्तर्षींच्या आज्ञेने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त रामनाथी (गोवा) येथे वैशाख कृष्ण सप्तमी (२२.५.२०२२) या दिवशी रथोत्सव साजरा करण्यात आला. या रथोत्सवात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी श्रीविष्णूची वेशभूषा केली होती. त्या वेळी ते परिधान करणार असलेले सोवळे, उपरणे आणि शेला यांना इस्त्री करण्याची सेवा करतांना साधकाला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

श्री. भूषण कुलकर्णी

१. शेल्याला इस्त्री करत असतांना त्याचा गुलाबी रंग पालटून तो श्रीविष्णूच्या रंगासारखा निळा होत असल्याचे दिसणे

२०.५.२०२२ या दिवशी रात्री ९.२० वाजता मी परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांचे सोवळे, उपरणे आणि शेला यांना इस्त्री करण्याच्या सेवेला आरंभ केला. प्रथम मी शेल्याची इस्त्री करत असतांना त्याचा गुलाबी रंग पालटून तो श्रीविष्णूच्या रंगासारखा निळा होत असल्याचे मला दिसले. २० आणि २१.५.२०२२ या दोन्ही दिवशी शेल्याला इस्त्री करतांनाही मला ही अनुभूती आली.

२. सोवळे आणि उपरणे यांना इस्त्री करतांना त्यांतील चैतन्यामुळे गारवा जाणवणे

मी ज्या खोलीत इस्त्री करायला गेलो, त्या खोलीचे दरवाजे आणि खिडक्या बंद होत्या. मी खोलीत पंखाही लावला नव्हता. असे असतांनाही सोवळे आणि उपरणे इस्त्री करत असतांना या दोन्हींतून पुष्कळ चैतन्य मिळत असल्याने मला थंडी वाजत होती. त्या वेळी माझ्या लक्षात आले, ‘सोवळे आणि उपरणे यांतून प्रक्षेपित होत असलेले श्रीविष्णुस्वरूप परात्पर गुरुदेवांचे चैतन्य इतके आहे की, ते ओसंडून वहात होते.’ ही सेवा सलग दीड घंटा करत असतांना मला तेवढा वेळ गारवा जाणवत होता.

३. सेवा करतांना दैवी सूक्ष्म सुगंध येणे, हातांचे तळवे पिवळे दिसणे आणि खोलीत पिवळा प्रकाश दिसणे

ही सेवा करत असतांना मधे मधे मला हीना, मोगरा आणि चंदन यांचा; तसेच कधी कापराचा दैवी सूक्ष्म सुगंध येत होता. मधे मधे मी माझ्या दोन्ही हातांचे तळवे बघत होतो. त्या वेळी मला ते पिवळेधमक दिसत होते. असे मला ४ – ५ वेळा दिसले. त्या वेळी मला खोलीतील प्रकाश पिवळा दिसत होता. खरेतर एवढा वेळ हातात इस्त्री धरल्यावर माझे हात लालसर व्हायला हवे होते; पण तसे झाले नाही.

४. ही सेवा करत असतांना बऱ्याच वेळा माझा आतून ‘निर्विचार’ हा नामजप होत असल्याने मला निर्विचार स्थिती आणि काही वेळा भावाची स्थिती अनुभवता येत होती.

५. ही सेवा झाल्यावर सूक्ष्मातून मला ते सोवळे, उपरणे आणि शेला परिधान केलेल्या परात्पर गुरुदेवांचे  श्रीविष्णुस्वरूपात दर्शन झाले.

– श्री.भूषण कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.५.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक