डिचोली (गोवा) येथील तिथीनुसार शिवराज्याभिषेकदिन सोहळ्यात १२५ हिंदूंनी घेतली हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कटीबद्ध होण्याची शपथ !

डिचोली, १२ जून (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिथीनुसार राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित डिचोली येथील कार्यक्रमात १२५ हिंदूंनी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कटीबद्ध होण्याची शपथ घेतली. विश्‍व हिंदु परिषद, बजरंग दल, शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानची गोवा शाखा आणि डिचोली येथील शिवप्रेमी गट येथील दिनदयाळ सभागृहात आयोजित कार्यक्रमात उपस्थित होते. ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य युवा पिढीला समजावे आणि घराघरात छत्रपती शिवाजी महाराज सिद्ध व्हावे’, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे या नात्याने स्थानिक आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये उपस्थित होते.

प्रारंभी डिचोली येथील चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळ्याला अभिषेक घालून त्यांची पूजा करण्यात आली आणि सायंकाळी दिनदयाळ सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी वक्ते श्री. श्रीराम आठले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याविषयी मार्गदर्शन केले. या वेळी वेशभूषा स्पर्धाही घेण्यात आली. कार्यक्रमात शिवप्रेमी गोविंद साखळकर यांचे ‘गडकिल्ले आणि शिवकालीन शस्त्रे’ यांचे प्रदर्शन भरवण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्या हस्ते नारळ वाढवून झाले.

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कटीबद्ध होण्यासाठीची शपथ !

कार्यक्रमात समीर गावस यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सर्वांकडून पुढीलप्रमाणे शपथ म्हणवून घेतली –

” देव, देश आणि धर्म यांची कोणत्याही प्रकारची विटंबना आम्ही सहन करणार नाही, तर यांवर आलेल्या प्रत्येक संकटाचा आम्ही तीव्र प्रतिकार करून ते परतवून लावणार. हिंदु राष्ट्राच्या दिशेने आम्ही मार्गक्रमण करणार. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा बनणार. प्रभु श्रीरामचंद्र, भगवान श्रीकृष्ण आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेल्या आदर्श पद्धतीनुसार आम्ही वाटचाल करणार. पूर्वज ऋषिमुनींनी घालून दिलेल्या परंपरांचा आम्ही अभिमान बाळगणार. धर्मग्रंथ, संस्कृती, परंपरा आदींचे काटेकोरपणे पालन करणार. धर्म, मंदिरे, गाय आणि स्त्री यांचे प्राणपणाने रक्षण करणार. यापुढे हिंदु राष्ट्र हेच आमच्या जीवनाचे ध्येय असेल आणि त्यासाठी आम्ही अखेरच्या श्‍वासापर्यंत कार्यरत रहाणार. हिंदु राष्ट्र स्थापन केल्याविना आम्ही शांत बसणार नाही. “