हिंदु राष्ट्र स्थापन होईपर्यंत हिंदु राष्ट्राची मागणी करत रहाणार ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

कोकणचे क्रमांक १ चे यूट्यूब चॅनल ‘कोकण नाऊ’वरून दशम् अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाला व्यापक प्रसिद्धी

सिंधुदुर्ग – ‘कोकणचे क्रमांक १ चे यूट्यूब चॅनल’ ‘कोकण नाऊ’ने हिंदु जनजागृती समितीच्या हिंदु राष्ट्रासाठी चालू असलेल्या अथक प्रयत्नांची नोंद घेत रामनाथ देवस्थान, रामनाथी, फोंडा, गोवा येथे १२ ते १८ जून या कालावधीत होणार्‍या ‘दशम् अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या पार्श्‍वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा दौर्‍यावर आलेले समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगढ या राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट यांची मुलाखत प्रसारित करून समितीचे कार्य, हिंदु राष्ट्राची संकल्पना, अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाची दिशा आणि ध्येय, असे विविध विषय ४० मिनिटांच्या मुलाखतीच्या माध्यमातून समाजासमोर पोचवले. या वेळी श्री. सुनील घनवट यांनी हिंदु राष्ट्राला विरोध करणार्‍यांना ठणकावून सांगितले की, ‘आम्ही हिंदु राष्ट्राची मागणी करत होतो, करत आहोत आणि कुणीही कितीही आक्षेप घेतला, तरी जोपर्यंत हिंदु राष्ट्राची स्थापना होत नाही, तोपर्यंत ही मागणी करत रहाणारच.’

डावीकडून निवेदिका कोमल पाटील आणि श्री. सुनील घनवट

सत्त्वगुणी लोकांचे राज्य ते हिंदु राष्ट्र !

मुलाखतीत श्री. घनवट यांनी सांगितले की, वर्ष २०१२ मध्ये हिंदु राष्ट्र अधिवेशनाला प्रारंभ झाला. त्या वेळी हिंदु राष्ट्र हा विषय कोणत्याही स्तरावर चर्चेत नव्हता; मात्र आता हा विषय सर्वत्र चर्चिला जाऊ लागला आहे. सत्त्वगुणी लोकांचे राष्ट्र ते हिंदु राष्ट्र होय. ‘अवघे विश्‍वची माझे घर’, हा व्यापक दृष्टीकोन केवळ हिंदु धर्म देतो. अन्य पंथियांमध्ये ही व्यापकता नाही. अन्य पंथियांप्रमाणे हिंदु धर्म संकुचित नव्हे, तर हिंदु हा व्यापक धर्म आहे. जगात ख्रिस्ती, इस्लाम, बौद्ध अशा धर्मियांची अनेक राष्ट्रे आहेत. ज्यू लोकांचे इस्रायल हे स्वतंत्र राष्ट्र आहे; मग १०० कोटी हिंदू असलेल्या लोकांचे हिंदु राष्ट्र का घोषित केले जाऊ नये ? बहुसंख्य हिंदू असूनही मतपेटीच्या राजकारणामुळे हिंदूंकडे दुर्लक्ष करून अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन केले जात आहे. धर्मनिरपेक्ष देश म्हणत अन्य पंथियांचा उदोउदो करणार्‍या या देशाला धर्मनिरपेक्ष कसे म्हणता येईल ? छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे सर्वसमावेशक असे राष्ट्र म्हणजे हिंदु राष्ट्र स्थापन करायचे आहे. हिंदु राष्ट्राची मागणी ही संविधानिक आहे, याला कोणाचा विरोध असण्याचे कारण नाही. सर्व हिंदूंनी एक होऊन हिंदु राष्ट्राची मागणी केली, तर राजकारण्यांना त्यांची नोंद घेऊन हिंदु राष्ट्र घोषित करावे लागेल.

केवळ समान नागरी कायदा झाल्यावर हिंदु राष्ट्र होणार नाही !

‘समान नागरी कायदा झाल्यानंतर हिंदु राष्ट्र होईल, असे बोलले जाते’ यावर  घनवट म्हणाले, ‘‘सध्या काही राज्यांत समान नागरी कायदा आहे. हिंदू हे कायदा मानून चालणारे आहेत; मात्र ज्यांना कायदाच मान्य नाही, जे कायदा पाळत नाहीत, असे काही पंथ आहेत. त्यामुळे केवळ समान नागरी कायदा करून हिंदु राष्ट्र होईल, असे वाटत नाही.’’

सर्व मंदिरे मुक्त झाली पाहिजेत !

राममंदिराचे काम चालू झाले आहे, त्याप्रमाणे ज्ञानवापी मशीद, मथुरा, काशी मुक्त करण्याची मागणी का करू नये ? धर्मबंधुत्वाची भावना बोलली जात आहे, तर भारतीय मुसलमानांनी स्वत:हून पुढे येऊन हिंदूंना ‘तुमची मंदिरे तुम्ही कह्यात घ्या’, असे सांगितले पाहिजे. देशातील ४० सहस्र मंदिरे आहेत, ज्यावर अतिक्रमण केले आहे. मशिदी बांधल्या आहेत. ही सर्व मंदिरे मुक्त झाली पाहिजेत, असे घनवट यांनी या वेळी सांगितले.

या वेळी श्री. घनवट यांनी समिती सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आदी विविध स्तरांवर कसे कार्य करत आहे, याची माहिती दिली.

श्री. सुनील घनवट यांनी समितीच्या कार्याला, तसेच अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन या ज्वलंत विषयाला सर्व समाजासमोर नेऊन प्रसिद्धी दिल्याविषयी ‘कोकण नाऊ चॅनल’च्या संपूर्ण गटाला धन्यवाद देऊन आभार मानले.