अपयशाकडे कसे पहाल ?

(प्रतिकात्मक छायाचित्र)

इयत्ता १२ वीचा निकाल घोषित झाला. यामध्ये काही जण अनुत्तीर्ण, तर काही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी ‘कोणते ‘बॉलीवूड सेलिब्रेटी’ १२ वीच्या परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण झाले होते’, त्यांची सूची अन्य संकेतस्थळांवर बातमी म्हणून प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये अनुत्तीर्ण झालेले, ज्यांना शिक्षणाची आवड नव्हती; म्हणून त्यांनी शिक्षण अर्धवट सोडून दिले आणि काही जणांना परिस्थितीमुळे शिक्षण सोडावे लागले, या सर्वांच्या नावांचा समावेश आहे. ‘१२ वीमध्ये अनुत्तीर्ण झालेल्यांमध्ये बॉलीवूडमधील सेलिब्रेटींचा समावेश आहे’, असे म्हटल्यावर ज्या तरुणांसमोर ‘सेलिब्रेटीं’चा आदर्श आहे, त्यांच्या मनात ‘आपण अनुत्तीर्ण झालो; म्हणून काही बिघडत नाही’, असा विचार येऊ शकतो आणि हा विचार धोकादायक आहे.

विद्यार्थ्यांनी निराश होऊ नये, यासाठी अशा बातम्या प्रसिद्ध करणे योग्य म्हटले, तरी परीक्षेत अनुत्तीर्ण का झालो ? कुठे प्रयत्न अल्प झाले ? यापुढे काय काळजी घ्यायला हवी ? याचाही अभ्यास होणे आवश्यक आहे. ‘शैक्षणिक क्षेत्रात अनुत्तीर्ण झालो; म्हणून ‘सेलिब्रेटी’ होऊ शकतो’, असा विचार आता केला, तरी अभिनय क्षेत्रामध्ये यश मिळवणे तेवढे सोपे नाही, हा भागही लक्षात घ्यायला हवा. अशा प्रकारच्या बातम्या वाचून काही जण मनोराज्यात रमू शकतात आणि ते तरुणांसाठी धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे अशा प्रसंगी जीवनामध्ये येणाऱ्या अपयशाकडे पहातांना कसा विचार करायला हवा ? याविषयीचे प्रबोधन करणाऱ्या बातम्या किंवा लेख प्रसिद्ध करायला हवेत. जीवनात प्रत्येकाला कधी ना कधी अपयशाला सामोरे जावे लागते. लहानपणापासूनच अपयशाकडे कसे पहायचे ? हे मुलांना शिकवल्यास संपूर्ण जीवनात कधीही अपयश पदरी पडले, तरी मुले डगमगणार नाहीत किंवा आत्महत्येसारखे पाऊल उचलणार नाहीत, हे नक्की !

जीवनामध्ये येणाऱ्या मोठ्या अपयशांमध्ये क्रियमाण कर्म आणि प्रारब्ध या दोन्हींचा वाटा असतो. त्यामुळे अपयश येऊ नये, यासाठी साधना करून प्रारब्ध कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे महत्त्व समजून सांगणे आवश्यक आहे, तसेच अपयश मिळण्यामध्ये कोणते क्रियमाण कसे वापरायला हवे ? याचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा आहे. असे झाले, तरच आपण तरुणांना योग्य दिशा देत आहोत, असे होईल. ‘अपयश ही यशाची पहिली पायरी आहे’, अशी म्हण आहे. त्यासाठी अपयशाचा अभ्यासही आवश्यक !

– वैद्या (सुश्री [कु.]) माया पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल.