मुंबई – मुंबई परिसरातील पोलीस ठाण्यात ‘पॉक्सो’ (लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा) किंवा विनयभंग या संदर्भातील गुन्हे नोंद करण्यापूर्वी पोलीस उपायुक्तांची अनुमती घ्यावी लागणार आहे. याविषयीचा आदेश मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी दिला आहे.
या आदेशात पांडे यांनी म्हटले आहे की, जुना किंवा मालमत्तेचा वाद यांतून किंवा अन्य कोणत्याही वैमनस्यातून पोलीस ठाण्यात पॉक्सो किंवा विनयभंग याविषयीच्या तक्रारी प्रविष्ट होतात. यात अनेक वेळा आरोपी निर्दोष ठरतो; मात्र तोपर्यंत पुष्कळ विलंब झालेला असतो आणि यात आरोपीची मानहानी होते. त्यामुळे प्रथम साहाय्यक पोलीस आयुक्त या तक्रारीची चौकशी करतील आणि नंतर पोलीस उपायुक्तांनी अंतिम आदेश दिल्यावर गुन्हा नोंद करण्यात यावा. पॉक्सो कायद्याचा गैरवापर होत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. जुनी भांडणे, मालमत्तेचे वाद, वैमनस्य अशा अनेक कारणांमुळे पोलीस ठाण्यात खोट्या तक्रारी झाल्या आहेत.