संभाजीनगर – भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री सौ. पंकजा मुंडे यांना प्रथम राज्यसभा आणि आता विधान परिषदेसाठी उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांच्या ४ समर्थकांनी उस्मानपुरा येथील भाजप कार्यालयासमोर ९ जून या दिवशी घोषणा देत आंदोलन केले. या वेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली. भाजपचे शहराध्यक्ष संजय केनेकर याविषयी म्हणाले की, संबंधित कार्यकर्ते हे भाजपचे नाहीत. भाजप कार्यालयाची कुठलीही तोडफोड करण्यात आलेली नाही, तसेच संबंधितांना पोलिसांनी कह्यात घेतल्याची माहिती केनेकर यांनी दिली.
पंकजा मुंडे यांना पक्षात सातत्याने डावलले जात असल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. विधान परिषदेच्या १० जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत पंकजा मुंडे या संभाव्य उमेदवार होत्या; परंतु कर्जत-जामखेड मतदारसंघाचे माजी आमदार, धनगर समाजाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री राम शिंदे यांचे नाव देहली येथून निश्चित झाल्यामुळे मुंडे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे अप्रसन्न झालेल्या पंकजा यांच्या समर्थकांनी येथे आंदोलन केले.