ज्योतिष अधिवेशन हा ज्ञान सोहळा असून सर्वांनी ज्ञानप्राप्ती करावी !

  • पं. अतुलशास्त्री भगरे यांचे आवाहन

  • अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन

पं. अतुलशास्त्री भगरे

पुणे – प्रत्येक दुःखी व्यक्तीला मानसिक आधार देण्याचे काम ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून करावे. या शास्त्राशी निष्ठा ठेवावी. दैनंदिन जीवनात त्रस्त झालेल्या व्यक्तींना योग्य दिशा दाखवावी. ज्योतिष अधिवेशन हा ज्ञान सोहळा आहे. त्यातून सर्वांनी ज्ञानप्राप्ती करावी. ज्योतिषशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी एकाग्रता ठेवावी, तरच हे शास्त्र यशाकडे नेईल, असे आवाहन पं. अतुलशास्त्री भगरेगुरुजी यांनी व्यक्त केले. श्री ज्योतिष संशोधन केंद्राच्या (जळगाव) वतीने आयोजित २ दिवसांच्या अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनाचे उद्घाटन टिळक स्मारक मंदिर येथे पं. अतुलशास्त्री भगरेगुरुजी यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. अधिवेशनाला संपूर्ण महाराष्ट्रातून ज्योतिषप्रेमी उपस्थित होते.

कार्यक्रमाला ज्योतिषरत्न नंदकिशोर जकातदार, हिंदु महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे, महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष अनिल चांदवडकर, परशुराम सेवा संघाचे अध्यक्ष विश्वजित देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी डॉ. ज्योती जोशी यांच्या हिंदी भाषेतील अनुवादित ज्योतिष विषयावरील ३ पुस्तकांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. अधिवेशनाचे हे दुसरे वर्ष असून, मागील वर्षी अधिवेशन ‘ऑनलाईन’ पद्धतीने घेण्यात आले होते.