परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या कार्यक्रमातील अडथळे दूर होण्यासाठी प्रार्थना करतांना साधिकेला जाणवलेली सूत्रे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवातील अडथळे दूर होऊन तो सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा’, यांसाठी रामनाथी आश्रमात २०.५.२०२२ या दिवशी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. ती प्रार्थना पुढीलप्रमाणे होती, ‘हे श्रीमन्ननारायणा, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवामध्ये वारा, पाऊस, तसेच अन्य नैसर्गिक आपत्ती यांच्या माध्यमातून कोणतेही अडथळे येऊ नयेत, तसेच जन्मोत्सव निर्विघ्नपणे पार पडू दे’, अशी तुझ्या चरणी आर्ततेने प्रार्थना आहे !’

कु. प्रतीक्षा हडकर

१. प्रारंभी गुरुचरण समोर दिसून प्रार्थना होणे, नंतर आपोआपच आतून प्रार्थना होणे अन् ‘ही प्रार्थना आत्माच परमात्म्याला करत आहे’, असे जाणवणे

वरील प्रार्थना करतांना प्रत्येक वेळी मला डोळ्यांसमोर गुरुचरण दिसायचे. त्या वेळी मी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे चरण धरून त्यांना प्रार्थना करत आहे’, असे मला जाणवायचे. आधी २ – ३ वेळा प्रार्थना झाली. नंतर आतूनच प्रार्थना होऊ लागली. मला कळतच नव्हते, ‘ही प्रार्थना कोण करत आहे ?’ नंतर ‘ही प्रार्थना आत्मा परमात्म्याला करत आहे’, असे मला जाणवले. माझ्याकडून प्रार्थनेच्या समवेत कृतज्ञताही व्यक्त होत होती. प्रार्थना करतांना मला पुष्कळ भरून येत होते.

२. प्रार्थना करतांना ‘परात्पर गुरु डॉक्टर सर्वकाही करू शकतात, ते साधकांना प्रार्थना करण्यास सांगून स्वतः नामानिराळे रहातात’, असे वाटणे

जन्मोत्सवासाठी प्रार्थना करत असतांना माझ्या मनात पुढील विचार आले, ‘परात्पर गुरु डॉक्टर सर्वकाही करू शकतात. पाऊस, वारा आणि अन्य नैसर्गिक आपत्ती यांपासून ते रक्षण करतच असतात. देव (परात्पर गुरु डॉक्टर) साधकांना प्रार्थना करण्यास सांगून स्वतः नामानिराळा रहातो. ‘प्रार्थनेमुळे सर्व झाले’, असे देव नेहमीच म्हणतो. प्रार्थना करण्यास सांगणारा तोच परम दयाळू, भक्तवत्सल आणि कृपावत्सल परमेश्वर आहे.’

३. गोप-गोपी, पशू-पक्षी, प्राणी इत्यादींच्या रक्षणासाठी श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत एका करंगळीवर उचलला आणि गोप-गोपींनी हातातील काठ्या गोवर्धन पर्वताला लावून आधार दिला. त्याप्रमाणेच ‘जन्मोत्सवासाठी प्रार्थना करणे’, हे गोप-गोपींनी गोवर्धन पर्वताला लावलेल्या काठीप्रमाणे आहे’, असे मला वाटले.

४. ‘सुदर्शनचक्र कार्यरत झाले आहे. साधकांभोवती संरक्षक कवच निर्माण करून देव (परात्पर गुरु डॉक्टर) जणू सर्वांचे रक्षण करत आहे’, असे मला जाणवले. देवा, मी तुझ्या चरणी पुष्कळ कृतज्ञता व्यक्त करते.’

– कु. प्रतीक्षा हडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.५.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक