धर्मसत्संगांच्या माध्यमातून भविष्यातील हिंदु दूरचित्रवाहिनीची पूर्वसिद्धता करवून घेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी लिहितांना बुद्धी आणि शब्द यांना मर्यादा येतात. परात्पर गुरु डॉक्टरांच्या सत्संगातील एकेक क्षण म्हणजे अविस्मरणीय आणि आनंद देणारा सोनेरी क्षण आहे. वर्ष २००९ मध्ये बेंगळुरू येथील श्री शंकरा वाहिनीसाठी धर्मसत्संग सिद्ध करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना या सेवेतील प्रत्येक टप्प्याला मार्गदर्शन केले. त्यांनी साधकांना प्रतिदिन ‘संहिता लिखाण, चित्रीकरण, संकलन आणि या संदर्भातील अन्य सेवांतील’ अनेक बारकावे शिकवले. ‘सत्संग सात्त्विक व्हावेत आणि त्यासंबंधी सेवा करतांना साधकांची साधना व्हायला हवी’, यांसाठी परात्पर गुरु डॉक्टर दिवस-रात्र परिश्रम घेत होते. काहीही अनुभव नसतांना ‘वाहिनीसाठी धर्मसत्संग सिद्ध करणे’, ही साधकांसाठी आव्हानात्मक सेवा होती; परंतु ‘परात्पर गुरु डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि त्यांची कृपा’ यांमुळे साधकांना सेवा करणे शक्य झाले. सत्संग चालू झाल्याच्या पहिल्या दिवसापासून ते प्रक्षेपणाच्या शेवटच्या दिवसापर्यंत ही सेवा करतांना प्रत्येक दिवसाला सत्संगांची गुणवत्ता वाढत गेली, ती केवळ आणि केवळ परात्पर गुरु डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळेच ! परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना कार्य कुशलतेने आणि परिपूर्ण कसे करायचे, हे वेळोवेळी शिकवले. त्यांनी साधकांची साधना होण्याकडेही लक्ष दिले. या संदर्भातील काही सूत्रे येथे थोडक्यात दिली आहेत. (भाग १)

१. धर्मसत्संगातील प्रत्येक कृती सात्त्विक करायला शिकवणे

१ अ. धर्मसत्संग पहाणाऱ्याचे पूर्ण लक्ष विषयाकडे केंद्रित असण्यासाठी सत्संगाची पार्श्वभूमी सात्त्विक बनवायला सांगणे : वर्ष २००९ मध्ये वाहिनीने धर्मसत्संगांच्या प्रक्षेपणाचा दिवस कळवल्यावर साधक धर्मसत्संगाचे चित्रीकरण आणि संकलन सेवेच्या पूर्वसिद्धतेला लागले. चित्रीकरणाच्या पडद्यावर निवेदक आणि त्याच्या पार्श्वभूमीला किंवा बाजूला एखादे ‘ॲनिमेशन’ केलेले चित्र घ्यायचे, अशी चित्रीकरणाची संकल्पना काही प्रमाणात सिद्ध करून साधक परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ती दाखवण्यासाठी गेले. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना सांगितले, ‘‘आपला विषय (धर्मशिक्षण) महत्त्वाचा असल्याने सत्संग पहाणाऱ्याचे पूर्ण लक्ष त्या विषयाकडे असायला हवे. त्यासाठी ‘ॲनिमेशन’ केलेले चित्र किंवा गडद रंगाची पार्श्वभूमी नको.’’ निवेदकाच्या पार्श्वभूमीचा रंग निवडतांना त्यांनी तो कलेच्या संदर्भात सेवा करणाऱ्या साधकांना विचारून अंतिम करायला सांगितला. त्यानंतर त्या साधकांचे साहाय्य घेऊन दोन पार्श्वभूमी सिद्ध करण्यात आल्या. एका पार्श्वभूमीवर गणपति आणि दुसऱ्या पार्श्वभूमीवर श्रीकृष्ण यांची चित्रे असलेल्या दोन पार्श्वभूमी परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांकडून अंतिम करून घेतल्या. अशा प्रकारे साधकांना सात्त्विक चित्रीकरण करण्याचा पाठ मिळाला.

१ आ. धर्मसत्संगाचा आरंभ सात्त्विक पद्धतीने होण्यासाठी मार्गदर्शन करणे : ‘एखादे शीर्षकगीत अथवा संगीत’ याने वाहिनीवरील कोणत्याही कार्यक्रमाचा आरंभ होतो. त्याप्रमाणे साधकांनी धर्मसत्संगांच्या आरंभी घ्यायची एक सामाईक धारिका बनवली. परात्पर गुरु डॉक्टरांनी ती धारिका पाहून ती सात्त्विक नसल्याचे लक्षात आणून दिले. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘कार्यक्रमाचा आरंभ असा हवा की, त्याने पहाणाऱ्याचा भाव जागृत व्हायला हवा.’’ साधकांनी परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितलेल्या सुधारणा करून अंतिम धारिका सिद्ध झाली. या सामाईक धारिकेत आरंभी घंटानाद आणि श्रीगणेशाचा श्लोक अन् गणपतीचे चित्र होते. परात्पर गुरु डॉक्टरांनी देवतांची तत्त्वे आकर्षित करणाऱ्या सात्त्विक रांगोळ्याही घेण्यास सांगितले. त्या पहातांना अनेकांनी भाव जागृत होत असल्याची अनुभूती घेतली.

१ इ. निवेदकाच्या पोशाखातून सात्त्विक स्पंदने येण्यासाठी त्यातील बारकावे लक्षात आणून देणे : परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘प्रेक्षकांचे लक्ष निवेदकाच्या पोशाखाच्या रंगाकडे न जाता निवेदकाच्या बोलण्याकडे लक्ष जाईल’, असा पोशाखाचा रंग निवडण्यास सांगितले. त्याचप्रमाणे ‘साधकाच्या सदऱ्यावर एकही चुणी (सुरकुती) नको आणि साधिकेच्या पदराच्या निऱ्या एकसारख्या दिसायला हव्यात’, हे बारकावेही परात्पर गुरु डॉक्टरांनी लक्षात आणून दिले. ‘सदऱ्यावरील चुण्या किंवा अव्यवस्थित निऱ्या यांमुळे स्पंदने चांगली येत नाहीत. आपण केलेल्या प्रत्येक कृतीतून सात्त्विक स्पंदने यायला हवीत’, याचीच शिकवण त्यांनी आम्हाला या प्रसंगातून दिली.

२. सेवा कुशलतेने करायला शिकवणे

२ अ. परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘लोकांना धर्मशिक्षण मिळून ते कृतीप्रवण व्हायला हवेत’, असा उद्देश ठेवून साधकांना सत्संगाच्या संहितेचे लिखाण करायला सांगणे : ‘धर्मसत्संग ऐकल्याने लोकांना धर्मशिक्षण मिळून ते कृतीप्रवण व्हायला हवेत’, या उद्देशाने परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना सत्संगाच्या संहितेचे लिखाण करायला सांगितले. त्यांनी संहिता लिखाणातील अनेक बारकावेही साधकांच्या लक्षात आणून दिले. ‘सोपी भाषा, सुटसुटीत मांडणी, कठीण शब्दांना कंसात पर्यायी शब्द लिहिणे, इंग्रजी अथवा संस्कृत शब्द वापरल्यास त्याचा अर्थ लिहिणे, संस्कृत आणि हिंदी या भाषांतील शब्द व्याकरणदृष्ट्या योग्य आहेत का ?’, अशा अनेक गोष्टी त्यांनी साधकांना पहायला शिकवल्या.

२ आ. धर्मसत्संग पहाणाऱ्यांचा विचार करून संकलन करायला शिकवणे : सत्संगातील संहितेत काही वेळा तात्त्विक विषयाला धरून काही सारण्या (टेबल्स) असायच्या. ‘सारण्यांची रचना कशी असावी ? त्यातील कोणती अक्षरे वेगळ्या रंगाची असावीत ? कोणती अक्षरे ठळक असावीत ? जेणेकरून पहाणाऱ्याच्या ते लगेच लक्षात यावे’, याचेही अनेक बारकावे परात्पर गुरु डॉक्टरांनी शिकवले. ‘निवेदकाच्या बोलण्याची गती आणि इंग्रजी भाषेत दाखवण्यात येणाऱ्या तळपट्ट्यांची गती एकसारखी आहे ना ? काही संस्कृत शब्दांना इंग्रजी भाषेत प्रतिशब्द नसल्याने आहे, तोच शब्द घ्यावा लागतो, अशा शब्दांना वेगळा रंग दिला आहे ना ? दोन ओळींपेक्षा अधिक शब्दपट्ट्या (स्लाईड्स) असल्यास त्या ओळींचे सर्व बाजूंनी असलेले अंतर, तसेच प्रत्येक ओळीतील अंतर सारखे आहे ना ?’, यांसारख्या अनेक गोष्टी परात्पर गुरु डॉक्टर धर्मसत्संगाचे भाग पडताळतांना पहात असत. त्यामध्ये सुधारणा सांगतांना परात्पर गुरु डॉक्टरांचा ‘समोरच्या व्यक्तीला विषय समजायला सोपा जावा’, असा उद्देश असायचा. अशा प्रकारे धर्मसत्संगाचे संकलन झाल्याने पहाणाऱ्याला विषयाचे आकलन लगेच होत असे. धर्मसत्संग पाहून समाजातून चांगले प्रतिसाद मिळण्यास हेही एक कारण होते.

२ इ. सत्संगात दाखवण्यात येणाऱ्या छायाचित्रात सुधारणा सांगणे आणि त्यानंतर साधकांनी स्वतःहून चांगले छायाचित्र ठेवण्यासाठी प्रयत्न करणे : सत्संगाच्या संहितेत विषयानुरूप साधकांच्या अनुभूतींचाही समावेश असायचा. साधकांच्या आवाजात अनुभूतींचे ध्वनीमुद्रण करून त्याचे छायाचित्र जोडलेले असायचे. संकलन करतांना संबंधित साधकाचे जे छायाचित्र उपलब्ध आहे, ते छायाचित्र घेऊन साधक सत्संगाचा भाग पूर्ण करायचे. परात्पर गुरु डॉक्टर सत्संग पडताळतांना गंभीर विषयाला साधकाचे गंभीर छायाचित्र आणि चांगली अनुभूती असल्यास साधकाचे हसरे छायाचित्र घ्यायला सांगत. ते छायाचित्रातील अन्य सुधारणाही सांगत, उदा. साधकाने लावलेला तिलक तिरका असल्यास तो सरळ करणे, गळ्यातील हार तिरका दिसल्यास तो नीट करणे, अशा अनेक लहान सुधारणा परात्पर गुरु डॉक्टर सांगत. धर्मसत्संगाचे भाग पाठवायला समयमर्यादा असल्याने ‘सुधारणा होतील कि नाहीत’, अशी साधकांच्या मनात शंका आली, तरीही ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितले म्हणजे करायचे आहे’, असा विचार करून साधक सुधारणा करत असत. त्यानंतर पहिल्या टप्प्यातच साधकांचा ‘छायाचित्र चांगले आहे कि नाही ? त्यात काय सुधारणा कराव्या लागतील ?’, असा विचार होऊ लागला. त्यामुळे या सेवेसाठी लागणारा कालावधी नंतर अल्प झाला. ‘वेळ अल्प असला, तरीही जे करायचे, ते चांगलेच करायचे’, असे परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांच्या लक्षात आणून दिले.

२ ई. निवेदकाला कधी गंभीरपणे, तर कधी हसून बोलायला सांगून विषयानुरूप निवेदनात पालट करायला शिकवणे : विषयाप्रमाणे निवेदकाचे बोलणे कधी हसून, तर कधी गंभीर असायला हवे, त्याच्या बोलण्यात नैसर्गिकता हवी, अशा प्रकारच्या निवेदकाच्या बोलण्यातील सुधारणाही परात्पर गुरु डॉक्टर सांगत असत. निवेदकाचा एखाद्या शब्दाचा उच्चार चुकला, तर परात्पर गुरु डॉक्टर तेवढ्याच शब्दाचे परत ध्वनीमुद्रण करायला सांगून ते जोडायला सांगत. ‘चित्रीकरण आणि त्याचे संकलन’ यांतील प्रत्येक गोष्टीचा इतका बारकाईने विचार करायला हवा’, असे परात्पर गुरु डॉक्टरांच्या मार्गदर्शनामुळे प्रतिदिन साधकांना शिकायला मिळत होते.

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा: https://sanatanprabhat.org/marathi/586201.html

– सौ. श्रद्धा, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.६.२०२१) (क्रमशः)