वर्ष २००९ मध्ये बेंगळुरू येथील श्री शंकरा वाहिनीसाठी धर्मसत्संग सिद्ध करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना या सेवेतील प्रत्येक टप्प्याला मार्गदर्शन केले. त्यांनी साधकांना प्रतिदिन ‘संहिता लिखाण, चित्रीकरण, संकलन आणि या संदर्भातील अन्य सेवांतील’ अनेक बारकावे शिकवले.
७ जून २०२२ या दिवशी आपण परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘धर्मसत्संगातील प्रत्येक कृती सात्त्विक करायला शिकवणे’ आणि ‘सेवा कुशलतेने करायला शिकवणे’, हा भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहूया. (भाग २)
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा: https://sanatanprabhat.org/marathi/585929.html
३. धर्मसत्संगांची गुणवत्ता वाढवण्यासाठी साधकांकडून प्रयत्न करवून घेणे
३ अ. धर्मसत्संगात धार्मिक कृतींचे महत्त्व कळण्यासाठी सूक्ष्म-चित्र घ्यायला सांगणे आणि आरंभी एक स्थिर सूक्ष्म-चित्र घेण्यास सांगून नंतर त्याचे ‘ॲनिमेशन’ करण्यास सांगणे : धर्मसत्संगांच्या माध्यमातून समाजाला ‘धार्मिक कृतींचे महत्त्व कळावे’, यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘त्या कृतींचा सूक्ष्मातून परिणाम कसा होतो ?’, हे दर्शवणारे सूक्ष्म-चित्र सत्संगात घ्यायला सांगितले. आरंभी त्यांनी धर्मसत्संगाच्या एका भागात विषयानुरूप सूक्ष्म-चित्र घ्यायला सांगितले. नंतर त्यांनी सूक्ष्म-चित्र ‘ॲॅनिमेशन’ (टप्प्याटप्प्याने होणारी कृती दाखवणारे) स्वरूपात दाखवायला सांगितले. साधकांना एका धर्मसत्संगाच्या उत्तरार्धात एक सूक्ष्म-चित्र घ्यायला जमू लागल्यावर त्यांनी दोन्ही धर्मसत्संगांचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध यांत सूक्ष्म-चित्रे घ्यायला सांगितली. एक स्थिर सूक्ष्म-चित्र सत्संगात घ्यायला आरंभ केल्यावर पुढे काही दिवसांतच ६ ते १२ सूक्ष्म-चित्रांचे ‘ॲनिमेशन’ करून ते सत्संग पूर्ण होऊ लागले. यामुळे धर्मसत्संग परिणामकारक होऊ लागले आणि समाजातून त्याला उत्तम प्रतिसाद मिळू लागला.
३ आ. परात्पर गुरु डॉक्टरांनी धार्मिक कृतींचे चित्रीकरण धर्मशास्त्रानुसार अचूक होण्याकडे लक्ष देणे : धर्मसत्संगाच्या प्रायोगिक भागात जोडण्यासाठी धार्मिक कृतींचे वेगळे चित्रीकरण करावे लागत असे. ते चित्रीकरण परात्पर गुरु डॉक्टर पडताळायचे. त्या वेळी ते अनेक बारकावे पहात असत, उदा. चित्रीकरणात शिवपिंडी दाखवली असल्यास तिच्यावर पांढरेच फूल आहे ना, त्यावर हळद-कुंकू वाहिलेले नाही ना किंवा रंगीत अक्षता वाहिलेल्या नाहीत ना इत्यादी. यांपैकी एक जरी त्रुटी लक्षात आल्यास, ते शास्त्राला धरून नसल्याने परात्पर गुरु डॉक्टर त्याचे पुन्हा चित्रीकरण करायला सांगत असत. ‘चित्रीकरणासाठी निवडलेली जागा अथवा मंदिराचा परिसर स्वच्छ आहे ना ?’, हेही ते पहात असत. तसे नसल्यास ते साधकांना तेथे स्वच्छता करायला सांगून पुन्हा चित्रीकरण करायला सांगत असत. चित्रीकरणाच्या वेळी साधकांनी केलेल्या कृती धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे अचूक आहेत ना, हेही ते पहात असत. साधकांनी पुन्हा चित्रीकरण केल्यावर परात्पर गुरु डॉक्टर ते पुन्हा पहात. त्यानंतर त्याचे संकलन होऊन छोटी चित्रफीत सिद्ध होत असे. ती चित्रफीत जोडल्यावर मग धर्मसत्संग पूर्ण होत असे.
३ इ. धर्मसत्संगाच्या नियमित मालिकेत विशेष धर्मसत्संग चालू करण्यास सांगणे : धर्मसत्संगाचे नियमित प्रक्षेपण होऊ लागल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांनी सणांच्या निमित्ताने विशेष धर्मसत्संग बनवण्यास सांगितले, उदा. गुढीपाडव्याचा विशेष धर्मसत्संग. असे धर्मसत्संग करतांना भारतातील विविध प्रांतांमध्ये तो कशा प्रकारे साजरा करतात, तेही परात्पर गुरु डॉक्टरांनी सत्संगात घ्यायला सांगितले. त्यांनी विशेष धर्मसत्संगासाठी निवेदकाचा सदरा आणि निवेदिकेची साडी नेहमीपेक्षा वेगळी घ्यायला सांगितले. त्यांनी निवेदिकेला नेहमीपेक्षा वेगळे अलंकार घालायला; परंतु प्रेक्षकांचे निवेदिकेच्या अलंकारांकडे लक्ष जाणार नाही, इतपतच अलंकार घालायला सांगितले. ‘संकलन करतांना शब्दपट्ट्यांना पाना-फुलांचे तोरण घालायला हवे’, हेही त्यांनीच लक्षात आणून दिले. त्यामुळे विशेष धर्मसत्संग वैशिष्ट्यपूर्ण असे झाले. ‘होळी, रंगपंचमी, दिवाळी, नवरात्र’ असे विविध सण आणि उत्सव यांचे धर्मसत्संग सिद्ध झाले. या धर्मसत्संगांमुळे विविध सण आणि उत्सव साजरे करण्यामागील अध्यात्मशास्त्र समाजातील व्यक्तींना सांगता आले.
४. साधकांची साधना होण्याकडे लक्ष देणे
४ अ. संहिता लिखाणात चुका झाल्यास त्याचे दायित्व असलेल्या साधकांना संबंधित साधकांचा सत्संग घ्यायला सांगून साधकांना स्वतःतील स्वभावदोषांचे चिंतन करायला सांगणे : संहिता लिखाणात पुनःपुन्हा एकाच प्रकारच्या चुका लक्षात आल्यास ते संबंधित साधकांना प्रायश्चित्त घ्यायला सांगत. दायित्व साधकांना संबंधित साधकांचा सत्संग घ्यायला सांगून त्यात ‘त्या साधकांना त्यांच्यातील कोणत्या स्वभावदोषांमुळे चुका होत आहेत ?’, याचे चिंतन करायला सांगत. ‘संहिता लिखाणाची सेवा करणाऱ्या साधकांची साधनेत हानी न होता त्यांची योग्य दिशेने साधना होऊन आध्यात्मिक उन्नती व्हावी’, अशी परात्पर गुरु डॉक्टरांची तळमळ असे.
४ आ. साधकांकडून त्याच चुका पुन्हा झाल्यास त्यांना प्रायश्चित्त घ्यायला सांगून ‘ते पूर्ण होत आहे कि नाही ?’, याचा पाठपुरावा घेणे : चित्रीकरण आणि संकलन करणाऱ्या साधकांना चुका सांगूनही त्यांच्याकडून पुन्हा तशाच चुका होत असल्यास त्यावर परात्पर गुरु डॉक्टर साधकांना प्रायश्चित्त घ्यायला सांगत असत. त्यांनी साधकांना एका वहीत प्रायश्चित्ते लिहायला सांगितली आणि एका साधकाला ती वही प्रतिदिन पडताळायला सांगितली. वही पडताळणाऱ्या साधकाचा ते स्वतः पाठपुरावा घेत असत. साधकांना चुकांमुळे लागलेले पाप दूर होण्यासाठी प्रायश्चित्त पूर्ण होणे आवश्यक आहे, यासाठी परात्पर गुरु डॉक्टर पुनःपुन्हा तळमळीने विचारत असत. एकदा प्रायश्चित्त घेऊनही साधकांकडून पुन्हा तशीच चूक झाल्यास ते साधकांना दुप्पट, तिप्पट, चौपट अशा पटींत प्रायश्चित्ते घ्यायला सांगत असत.
४ इ. साधकांनी भावपूर्ण सेवा केल्यास परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांना चुका न सांगणे आणि साधकांच्या मनात कर्तेपणाचे विचार आल्यास परात्पर गुरु डॉक्टर त्यांना सेवेतील अनेक चुका दाखवून देत असल्याचे साधकांनी अनुभवणे : परात्पर गुरु डॉक्टर साधकांकडून सत्संगांची सेवा करवून घेत असतांना साधकांच्या साधनेकडेही लक्ष देत होते. साधकांनी झालेल्या चुकांसाठी मनापासून केलेली क्षमायाचना, शरणागतभावाने केलेली सेवा किंवा आत्मनिवेदन सगळ्यांचीच नोंद परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी होत असल्याचे साधक अनुभवत होते. चित्रीकरणाची सेवा करतांना सर्व साधकांनी मिळून शरणागतीने प्रार्थना केल्यावर परात्पर गुरु डॉक्टर त्या सेवेत एकही सुधारणा सांगत नसत आणि याच्या उलट बुद्धीने विचार करून किंवा मनात कर्तेपणाचा विचार येऊन सेवा केल्यास परात्पर गुरु डॉक्टरांकडून ‘अनेक चुका, फलकावर मोठ्या अक्षरांत चूक लिहिणे, दुप्पट प्रायश्चित्त घेणे’, असे यायचे. असाच अनुभव संकलन करणाऱ्या साधकांनीही अनेक वेळा घेतला. सत्संगात साधक स्वतःच्या मनाची प्रक्रिया सांगत असत. त्यावरून हा भाग सर्वांच्या लक्षात येत असे.
५. परात्पर गुरु डॉक्टरांच्या अस्तित्वाने कार्य होणे
५ अ. सेवा करतांना साधकांच्या आध्यात्मिक त्रासांत वाढ होत असल्याचे परात्पर गुरु डॉक्टरांना सांगितल्यावर साधकांचा त्रास न्यून होत असणे : धर्मसत्संगाच्या माध्यमातून समाजातील व्यक्तींना धर्मशिक्षण मिळणार असल्याने या सेवेत सूक्ष्मातून वाईट शक्तींचे अनेक अडथळे येत असत. वाईट शक्तींचा तीव्र त्रास असणारे साधकही धर्मसत्संगाच्या संकलनाची सेवा करत असत. या सेवेला येण्यापूर्वी त्यांच्या आध्यात्मिक त्रासांत वाढ होत असे. चित्रीकरणाच्या ठिकाणी अकस्मात् दिवे फुटणे, चित्रीकरणाशी संबंधित उपकरणे बंद पडणे, निवेदकांच्या तोंडवळ्यावर शारीरिक कारण नसतांना सूज येणे, ताप येणे, सतत तहान लागणे, असे आध्यात्मिक त्रास होत असत. परात्पर गुरु डॉक्टरांना याविषयी सांगितल्यावर लगेचच साधकांचे आध्यात्मिक त्रास न्यून होत असत. त्या वेळी ‘केवळ परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे या सेवा होत आहेत’, असे साधक अनुभवत असत.
५ आ. सेवेमुळे साधकांची अल्प काळ झोप होऊनही परात्पर गुरु डॉक्टरांतील चैतन्यामुळे साधकांना त्याची जाणीव नसणे : धर्मसत्संगाची सेवा करतांना आरंभी साधकसंख्या अल्प होती. त्यामुळे साधकांना दिवस-रात्र बसून सेवा पूर्ण करावी लागत असे. ‘धर्मसत्संग परिपूर्ण व्हायला हवेत’, अशी त्यांची तळमळ पाहून साधकांना सेवा करायला उत्साह वाटत असे. परात्पर गुरु डॉक्टर साधकांचे चांगले प्रयत्न पाहून त्यांचे कौतुकही करत आणि प्रसादही पाठवत असत. या सेवेमुळे साधकांना परात्पर गुरु डॉक्टरांचा सहवास आणि मार्गदर्शन लाभत असल्याने त्यांना ही सेवा करतांना ऊर्जा अन् चैतन्य मिळत असे. सलग जागरण झाले किंवा आठवडाभर केवळ ३ – ४ घंटे झोप झाली, तरीही साधकांच्या मनात त्याविषयी विचार येत नसे. साधकांचे सेवा करण्याकडेच लक्ष असे. ‘परात्पर गुरु डॉक्टरांतील चैतन्याच्या बळावर या सेवा पूर्ण होत आहेत’, असे त्यांना जाणवत असे.
६. अन्य सूत्रे
६ अ. चित्रीकरणासाठी अनुमती देणाऱ्यांना धर्मसत्संगाचे सिद्ध झालेले भाग आणि प्रसाद द्यायला सांगणे : धर्मसत्संगासाठी साधकांना बाहेर जाऊन चित्रीकरण करावे लागायचे. साधकांना चित्रीकरणासाठी अनुमती देणाऱ्या व्यक्तींचाही परात्पर गुरु डॉक्टर विचार करत असत. साधकांना चित्रीकरणासाठी अनुमती देणाऱ्या बाहेरील संबंधित व्यक्तींना परात्पर गुरु डॉक्टर धर्मसत्संगाचे सिद्ध झालेले भाग आणि प्रसाद भेट देण्यास सांगत. साधक संबंधितांना ती भेट देईपर्यंत परात्पर गुरु डॉक्टर त्याविषयीचा पाठपुरावा घेत असत.
६ आ. ‘अंतिम धर्मसत्संगाच्या ध्वनीचित्रफिती साधक व्यवस्थित ठेवत आहेत ना ?’, याचा पाठपुरावा घेणे : परात्पर गुरु डॉक्टर साधकांना सेवेच्या प्रत्येक टप्प्यात मार्गदर्शन करायचे. ‘केवळ सांगितले आणि सोडून दिले’, असे न करता ते प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा घेत असत. ‘चित्रीकरण, संहिता लिखाण, संकलन’, या सेवांसह सिद्ध झालेल्या अंतिम धर्मसत्संगाच्या ध्वनीचित्रफिती साधक व्यवस्थित ठेवत आहेत ना ?’, याकडेही ते लक्ष देत असत.
६ इ. प्रकृती ठीक नसतांनाही रात्री विलंबानेही धर्मसत्संगाचे भाग पडताळून देणे : धर्मसत्संगाच्या ध्वनीचित्रफिती सिद्ध करण्यासाठी आणि त्या बेंगळुरू येथे पाठवण्याची समयमर्यादा असायची. कधी कधी धर्मसत्संगाचे चित्रीकरण होऊन त्याचे संकलन पूर्ण होण्यासाठी रात्री विलंब होत असे. ‘धर्मसत्संगाचा भाग पूर्ण झाल्यावर मला उठवा. रात्री २ – ३ वाजले, तरी मला उठवा’, असे परात्पर गुरु डॉक्टर साधकांना सांगत असत. त्यांची प्रकृती ठीक नसायची आणि प्राणशक्तीही अल्प असायची, तरीही परात्पर गुरु डॉक्टर त्याचा कधीही विचार करायचे नाहीत. ते रात्री कितीही वाजले, तरी उठून धर्मसत्संगाचे भाग पडताळून देत असत.
६ ई. धर्मसत्संगाचे भाग पाठवण्यास विलंब झाल्यास अनेक पर्याय सुचवल्याने धर्मसत्संगाचे प्रक्षेपण वेळेत होऊ शकणे : ‘सत्संगाचे चित्रीकरण करणे, संकलन करणे, संकलन करून सिद्ध झालेला भाग परात्पर गुरु डॉक्टरांना दाखवणे, त्यांनी सांगितलेल्या सुधारणा करणे आणि मग तो भाग बेंगळुरू येथील वाहिनीच्या कार्यालयात पाठवणे’, या सर्व सेवांसाठी वेळेचे बंधन होते. यातील एका टप्प्यातील सेवेला वेळ लागल्यास पुढील सर्व प्रक्रिया होऊन तो भाग वाहिनीला पाठवतांना अत्यंत धावपळ होत असे. प्रतिदिन सकाळी ८ वाजता धर्मसत्संगाचे प्रक्षेपण असल्याने सकाळी ७.३० वाजेपर्यंत वाहिनीच्या कार्यालयात धर्मसत्संगाचा भाग कुठल्याही परिस्थितीत पोचणे आवश्यक असे. धर्मसत्संगाच्या भागाचे पार्सल रात्रीच्या बसने पाठवले जायचे. स्थानिक साधक ते पार्सल वाहिनीच्या कार्यालयात देत असत. कधी बस विलंबाने धावत असल्यास ‘बस बसस्थानकाहून निघून पुढे कुठे पोचली असेल ?’, याचा विचार करून साधक चारचाकीने त्या बसस्थानकापर्यंत जाऊन पार्सल घेत असत. धर्मसत्संगाचा भाग सिद्ध व्हायला फार उशीर झाल्यास आम्ही विमानाने पार्सल पाठवू लागलो. विमानाच्या वेळेतही भाग सिद्ध नसल्याने पाठवू शकत नाही, अशी स्थिती आली, तर दोन साधक चारचाकी घेऊन बेंगळुरूला जात. एक साधक बेंगळुरूला जातांना चारचाकी चालवत असे आणि तेथून येतांना दुसरा साधक चारचाकी चालवत असे.
अशा प्रकारे कितीही अडचणी आल्या, तरी वेळेत धर्मसत्संगाचे भाग पाठवण्यासाठीच्या उपाययोजना परात्पर गुरु डॉक्टरांनी वेळोवेळी सुचवल्या आणि त्यामुळे प्रतिदिन धर्मसत्संगाचे प्रक्षेपण होऊ शकले. साधकांना चारचाकीने बेंगळुरूला पार्सल घेऊन जायचे झाल्यास एवढ्या सगळ्या गडबडीतही परात्पर गुरु डॉक्टर ‘त्या साधकांनी थंडी असेल, तर स्वेटर, कोरडा खाऊ घेतला आहे ना ?’, असे विचारायचे.
७. प्रार्थना
परात्पर गुरु डॉक्टरांमध्ये नेतृत्व, प्रीती, तळमळ आदी सगळेच गुण कमाल मर्यादेचे आहेत, असे म्हणण्यापेक्षा त्यांच्यातील गुणांना परिसीमा नाही. धर्मसत्संगाच्या सेवेच्या माध्यमातून देवाने वेळोवेळी हे मला अनुभवायला दिले. या सेवेच्या माध्यमातून मला त्यांचा अनमोल सत्संग आणि मार्गदर्शन मिळाले. ‘त्यांच्याकडून शिकायला मिळालेल्या सर्व सूत्रांविषयी सतत कृतज्ञता वाटून ती कृतीत येऊ दे’, अशी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !
(समाप्त)
– सौ. श्रद्धा, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.६.२०२१)