काशी विश्‍वनाथ मंदिर परिसरात हनुमान चालीसाचे पठन करण्यास पोलिसांनी हिंदुत्वनिष्ठांना केला मज्जाव !

मंदिर परिसरातील हनुमानाची मूर्ती विवादित नाही !

वाराणसी – येथील ज्ञानवापी परिसरामध्ये हनुमान चालीसाचे पठण करण्यासाठी आलेल्या ‘ज्ञानवापी मुक्ती महापरिषदे’च्या हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना पोलीस आणि प्रशासन यांनी रोखले. साधारण ३० कार्यकर्त्यांना काशी विश्‍वनाथ मंदिर परिसरात असलेल्या हनुमानाच्या मूर्तीचे दर्शन आणि पूजन, तसेच हनुमान चालीसाचे पठण करायचे होते.

१. कार्यकर्त्यांचे म्हणणे होते की, हनुमान मंदिरात पूजन आणि स्तोत्र पठन करण्यासाठी  अनुमतीची आवश्यकता नाही. हनुमानाच्या मूर्तीवरून वाद नाही आणि हे विवादित स्थळ नाही.

२. हिंदुत्वनिष्ठांना पूजेची अनुमती न मिळाल्याने त्यांनी बुलानाला स्थित दक्षिणमुखी हनुमानासमोर हनुमान चालीसा वाचली आणि ‘ज्ञानवापी’च्या मुक्तीचा संकल्प केला. त्यांनी गेल्या आठवड्यात विश्‍वनाथ मंदिर येथील नंदीचे पूजन केले होते.

३. ‘सेंट्रल बार असोसिएशन’चे माजी उपाध्यक्ष राजा आनंद ज्योति सिंह म्हणाले की, हिंदूंच्याच मंदिरात पठण आणि पूजन करण्यासाठी रोखले जाते, याचे दु:ख होते. दुसरीकडे ज्ञानवापी मशिदीत जाऊन लोक (मुसलमान) नमाजपठण करत आहेत.

४. न्यूटन पांडेय म्हणाले की, ज्या मंदिराच्या संदर्भात कोणताही वाद नाही, तेथे पूजा करण्यासाठी अनुमती घ्यावी लागणे, ही लज्जास्पद गोष्ट आहे.