उजनी धरणातील ‘फेकल केलिफॉर्म’ या घातक जिवाणूचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी तत्परतेने कारवाई करावी !

हिंदु जनजागृती समितीचे सोलापूर येथे आमदारांना निवेदन

आमदार सुभाष देशमुख यांना निवेदन देतांना डावीकडून श्री. हिरालाल तिवारी आणि  श्री. दत्तात्रय पिसे

सोलापूर, ५ जून (वार्ता.) – मागील अनेक वर्षे उजनी धरणातील दूषित पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. विधीमंडळात चर्चा होऊनही या प्रकरणी अद्यापही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. वर्ष २०२१ मध्ये उजनी धरणाच्या ‘बॅक वॉटर’मध्ये ‘फेकल केलिफॉर्म’ हा जिवाणू आढळला आहेत. या धरणामध्ये सांडपाणी सोडण्यावर प्रतिबंध करण्यात यावा, तसेच धरणात सोडण्यात येणार्‍या पाण्यावर नियमानुसार शुद्धीकरण प्रक्रिया करण्यात यावी. या विषयाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून सहस्रो नागरिकांच्या जिवावर बेतलेल्या या संवेदनशील प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने सोलापूर येथील भाजपचे आमदार श्री. सुभाष देशमुख आणि श्री. विजयकुमार देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. (अशी मागणी का करावी लागते ? संपादक) या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. दत्तात्रय पिसे, श्री. सतीश कुंचपोर आणि सनातन संस्थेचे श्री. हिरालाल तिवारी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की,

वर्ष २०२१ मध्ये उजनी धरणाच्या ‘बॅक वॉटर’मध्ये ‘फेकल केलिफॉर्म’ हा जिवाणू आढळला आहे. याचा परिणाम उजनी धरणातील पाणी पिणार्‍या सहस्रो नागरिकांच्या आरोग्यावर होण्याची भीती आहे. या धरणातून भीमा नदीकाठावरील सर्व गावे, सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावे, तसेच पुणे येथील काही पाणीपुरवठा योजना यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. यापूर्वीही उजनी धरणातील दूषित पाण्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये विविध व्याधी बळावल्या आहेत. उजनी धरणातील दूषित पाण्याचा प्रश्न सोडवण्याकडे प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नाही.

अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्नांतर्गत प्रश्न उपस्थित करणार ! – सुभाष देशमुख, आमदार, भाजप

आमदार विजयकुमार देशमुख यांना निवेदन देतांना १. श्री. हिरालाल तिवारी आणि त्यांच्या बाजूला श्री. सतीश कुंचपोर

याविषयी आमदार सुभाष देशमुख समितीच्या कार्यकर्त्यांना म्हणाले, ‘‘उजनी धरणातील प्रदूषणाचा विषय महत्त्वाचा असून पावसाळी अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्न उपस्थित करण्यासाठी माझ्या ‘लेटरहेड’वर हा संपूर्ण विषय त्वरित पुढे पाठवतो.’’ आमदार विजयकुमार देशमुख यांनी ‘‘उजनी धरणातील प्रदूषणाचा विषय महत्त्वाचा आणि गंभीर आहे. पावसाळी अधिवेशनामध्ये हा प्रश्न उपस्थित करण्यासाठी प्रयत्न करतो’’, असे सांगितले.