स्वातंत्र्यवीर सावरकर हा सूर्य कधी मावळला नाही, तो कधी मावळणारही नाही ! – शरद पोंक्षे, ज्येष्ठ अभिनेते

‘स्वातंत्र्यवीर सावरकर विचार दर्शन’ या विषयावर पुणे येथे व्याख्यान

श्री. शरद पोंक्षे

पुणे – स्वातंत्र्यानंतर अनुमाने ५० वर्षांहून अधिक काळ काँग्रेसची ‘गल्ली ते दिल्ली’ सत्ता होती. या काळात शक्य त्या मार्गाने स्वातंत्र्यवीर सावरकरांची अपकीर्ती करण्याचा प्रयत्न केला गेला; परंतु स्वा. सावरकर हा सूर्य कधी मावळला नाही, तो कधी मावळणारही नाही, असे मत प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले. स्वा. सावरकर यांच्या १३९ व्या जयंतीनिमित्त स्वा. सावरकर जयंती समितीच्या वतीने नुकतेच ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विचार दर्शन’ या विषयावर पोंक्षे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे, समितीचे सूर्यकांत पाठक, विद्याधर नारगोलकर आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. ‘शब्दांमृत प्रकाशन’च्या वतीने शरद पोंक्षे यांच्या ‘दुसरं वादळ’ या पुस्तकाचे प्रकाशनही या वेळी झाले.

श्री. पोंक्षे पुढे म्हणाले की, स्वातंत्र्यानंतरही सरकारने सावरकरांचा अवमानच केला. सावरकरांना टिळकांची काँग्रेस मान्य होती, गांधींची नव्हती. हिंदी राष्ट्रवाद, मुसलमानांचे पराकोटीचे लांगूलचालन यांमुळे मी काँग्रेसमध्ये कधीच येऊ शकत नाही, हे सावरकरांनी स्पष्ट केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:ला गांधीवादी म्हणत असले, तरी ते मूळ सावरकरवादी आहेत. राजकीयदृष्ट्या योग्य भूमिका स्वीकारणे त्यांना जमते. इंदिरा गांधी यांनी पंतप्रधानपदी असतांना सावरकरांचा गौरव केला होता. हा इतिहास इंदिरा गांधींच्या नातवाला माहिती नाही. सावरकरांच्या विरोधकांवर जातीद्वेष, जातीभेदाचेच संस्कार होते. आमच्यावर सावरकरांचे संस्कार आहेत. ‘राम जिंकणार, रावण हरणार’, यावर माझा ठाम विश्वास आहे.

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले म्हणाले की, स्वा. सावरकरांचे केवळ पुतळे उभारून चालणार नाही, तर त्यांचा विज्ञानविचार आपण स्वीकारायला हवा. आपला देश सध्या अडचणीच्या ठिकाणी उभा असून भविष्यात काही संकटेही येणार आहेत. त्यामुळे सर्व तरुण-तरुणींनी एक झाल्यासच आपण येणाऱ्या संकटाला तोंड देऊ शकू. ही मागणी मी पंतप्रधान कार्यालयापर्यंत केली आहे.

संपादकीय भूमिका

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे केवळ पुतळे उभारू नका, तर त्यांचे विचार आत्मसात करा !