गडदुर्गांच्या दुरवस्थेसह हिंदु धर्मावरील आघात रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! – प्रसाद वडके, हिंदु जनजागृती समिती

आध्यात्मिक वारसा लाभलेल्या तुकसई गावातील युवक आणि ग्रामस्थ यांचा हिंदु राष्ट्र-जागृती सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद !

सभेला उपस्थित ग्रामस्थ

रायगड (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांच्या साहाय्याने हिंदवी स्वराज्याची स्थापना, तसेच राज्याच्या सुरक्षेसाठी गडदुर्गांची निर्मिती केली; पण सध्या गडदुर्गांची झालेली दुरवस्था आपण जाणतो. ही दुरवस्था दूर करणे, तसेच हिंदु धर्मावरील आघात रोखणे यांसाठी हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद वडके यांनी केले. रायगड जिल्ह्यातील तुकसई गावात नुकत्याच संपन्न झालेल्या हिंदु राष्ट्र जागृती सभेत ते बोलत होते. या सभेला ह.भ.प. लक्ष्मण एरंम महाराज, उंबरे गावच्या ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्री. समीर पांगारे यांच्यासह अध्यात्माचा वारसा लाभलेल्या तुकसई गावातील युवक आणि शेकडो गावकरी उपस्थित होते. या सभेच्या प्रसारासाठी गावातील धर्मप्रेमी युवक सर्वश्री सागर पांगारे, ज्ञानेश्वर पांगारे, निवृत्ती पांगारे, हरिचंद्र जंगम यांच्यासह गावातील धर्मप्रेमी हिंदू सहभागी झाले होते.

सभेच्या प्रारंभी गावातील धर्मप्रेमी श्री. मारुती पांगारे आणि श्री. लक्ष्मण पांगारे यांनी दीपप्रज्वलन केले. श्रीकृष्णाच्या चित्राचे पूजन पूजन श्री. बबन पांगारे आणि श्री. मधुकर पांगारे यांनी केले. श्री. जयवंत पांगारे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. समितीचे श्री. सागर चोपदार म्हणाले, ‘‘तुकसईसारख्या आध्यात्मिक गावात हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून धर्म आणि संस्कृती यांचे संस्कार केले जातात. असा प्रयत्न प्रत्येक गावात झाल्यास हिंदु राष्ट्र येण्यास वेळ लागणार नाही.’’