‘१७.४.२०२२ या दिवशी रामनाथी, गोवा येथील आश्रमात दैनिक ‘सनातन प्रभात’च्या गोवा आणि सिंधुदुर्ग आवृत्तीचा वर्धापनदिन सोहळा मोठ्या भावपूर्ण वातावरणात पार पडला. गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने मला ग्रंथप्रदर्शन आणि दैनिक ‘सनातन प्रभात’च्या पूजनाच्या या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली. तेव्हा मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. कार्यक्रम चालू होण्याआधी ध्यानमंदिरात दर्शन घेत असतांना ‘गुरुतत्त्व सगुण आणि निर्गुण रूपात कार्यरत झाले असून त्याचा लाभ सर्व साधक, जिज्ञासू, वाचक आणि हितचिंतक यांना होत आहे’, असे मला जाणवले.
२. आश्रमातील सर्व वस्तू चैतन्याने भारित असून त्या वस्तू ‘मी गुरुसेवा कशी करू ?’, असा विचार करून ‘त्या शरणागत आणि कृतज्ञता भाव ठेवून सेवा करत आहेत’, असे मला जाणवले.
३. श्रीकृष्णाच्या चित्रातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे निर्गुण गुरुतत्त्व प्रक्षेपित होणे, श्रीकृष्णाने ‘निर्गुण’ हा नामजप करत निर्गुण भाव अनुभवायला सांगणे, तसे केल्यावर आनंद अन् भाव अनुभवता येणे
स्वागतकक्षात आल्यावर मी तेथील श्रीकृष्णाच्या चित्राला विचारले, ‘मी आज कुठला भाव ठेवून सेवा करू ?’ मी डोळे मिटून ‘तो मला काय सांगत आहे ?’, हे ऐकण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ‘त्याच्या चित्रामधून निर्गुण गुरुतत्त्व, म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले विष्णुरूपात अवतरित झाले आहेत’, असे मला दिसले. त्या वेळी मला केवळ विष्णुरूपातील गुरुदेवांच्या देहाच्या कडा दिसत होत्या आणि ‘बाकी सगळी पोकळी आहे’, असे जाणवले. याचा अर्थ ‘श्रीकृष्णाने आज ‘निर्गुण’ हा नामजप करायला सांगितला असून ‘निर्गुण’ हा भाव अनुभवयाला सांगितला आहे’, असे माझ्या लक्षात आले. मी तसा भावप्रयोग केल्यावर ‘सर्वत्र गुरुदेवांचे निर्गुण तत्त्व कार्यरत झाले असून त्यांच्या कृपादृष्टीचा सर्वांवर वर्षाव होत आहे. ‘सर्व साधक भावपूर्ण सेवा करून त्यातील चैतन्य अनुभवत आहेत’, असे जाणवल्याने मला निर्गुण या नामजपातील आनंद आणि भाव अनुभवता आला.
४. प.पू. भक्तराज महाराज यांचे अस्तित्व निर्गुण रूपात जाणवणे
स्वागतकक्षातील प.पू. बाबांचे (प.पू. भक्तराज महाराज यांचे) छायाचित्र पहातांना त्यांचे अस्तित्वही निर्गुण रूपात कार्यरत झाले असून ‘ते त्यांची काठी हवेत फिरवून साधकांना चैतन्य देत आहेत’, असे मला जाणवले.
५. ‘श्री गणेशाचे निर्गुण तत्त्व बुद्धीची शुद्धी करत आहे’, असे जाणवणे
आश्रमाच्या परिसरातील श्री सिद्धिविनायकाला नमस्कार केल्यावर तिथेही मला ‘श्री सिद्धिविनायकाच्या जागी निर्गुण गणेशतत्त्व आहे’, असे अनुभवता आले. हे निर्गुण तत्त्व माझ्या बुद्धीमध्ये जात असून ‘श्री गणेश माझ्या बुद्धीची शुद्धी करत आहे’, असे जाणवल्यामुळे माझा भाव जागृत झाला.
६. श्री भवानीदेवीचे दर्शन घेतांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांची तीव्रतेने आठवण येणे, ‘देवीने दैनिक ‘सनातन प्रभात’ हातात घेऊन त्याला निळी पुष्पमाला अर्पण केली’, असे जाणवणे
त्यानंतर मी ‘श्री भवानीदेवीचे दर्शन घेतले. तेव्हा मला ‘देवीकडे पहातच रहावे’, असे वाटले. देवीचे रूप विलक्षण सुंदर दिसत होते. तिचे दर्शन घेतांना मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांची तीव्रतेने आठवण आली. तिला प्रार्थना करण्यासाठी मी डोळे बंद केल्यावर ‘साक्षात् श्री भवानीमाता दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन करत असून दैनिक ‘सनातन प्रभात’मधील वार्ता वाचकांच्या बुद्धीवर परिणाम करत आहेत. देवी साधक आणि धर्मवीर यांच्यावर क्षात्रतेज अन् ब्राह्मतेज यांचे प्रक्षेपण करत आहे. देवीने दैनिक ‘सनातन प्रभात’ हातात घेऊन त्याला निळी पुष्पमाला अर्पण केली’, असे मला जाणवले.
७. साधक पुरोहित पूजा सांगतांना वातावरणात श्री सरस्वतीदेवीचे चैतन्य पसरणे आणि ‘सरस्वतीदेवीने पूजेचा स्वीकार केला’, असे जाणवणे
साधक पुरोहित श्री. सिद्धेश करंदीकर आजच्या (१७.४.२०२२ च्या) ‘दैनिक सनातन प्रभात’च्या गोवा आणि सिंधुदुर्ग या आवृत्तीचे पूजन करत असतांना ‘वातावरणात श्री सरस्वतीदेवीचे तत्त्व मोठ्या प्रमाणात कार्यरत झाले असून तिचे चैतन्य संपूर्ण सभागृहात पसरत आहे. सगळ्यांचा कृतज्ञताभाव जागृत झाला असून साक्षात् सरस्वतीदेवी पूजेचा स्वीकार करण्यासाठी आली आहे. ती प्रसन्न मुद्रेने सर्व उपचार ग्रहण करत असून प्रत्येक उपचार देवीच्या ओंजळीत अर्पण होत आहे. तसेच पूजेमुळे देवी प्रसन्न झाली असून वातावरणातील दाबही नष्ट झाला आहे आणि देवीने वीणावादन करून सर्वांना आशीर्वाद दिला’, असे मला जाणवले.
८. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार प्रदर्शनस्थळी आल्यावर वातावरणातील प्रसन्नता वाढणे, तेव्हा सर्वांनी चैतन्य, शक्ती अन् आनंद अनुभवणे
दुपारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार प्रदर्शनस्थळी आल्यावर वातावरणातील प्रसन्नता अधिकच वाढली. त्या दोघींना पाहिल्यावर ‘आनंदाचे कारंजे वातावरणात प्रक्षेपित होत असून प्रत्येकाच्या हृदयातून तो आनंद बाहेर येऊन वातावरणात मिसळत आहे. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार समष्टीशी एकरूप झाल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून साधकांना चैतन्य आणि शक्ती मिळत असून सर्व जण एक वेगळाच आनंद अनुभवत आहेत’, असे मला जाणवले.
प.पू. गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने मला आजचा हा सोहळा भावासहित अनुभवता आला. त्याबद्दल गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
– सौ. निवेदिता योगेंद्र जोशी (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.४.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |