ससून रुग्णालयातून दिलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रांच्या चौकशीचे आदेश !

पुणे – जिल्हा परिषदेतील शिक्षकांनी मिळवलेली दिव्यांग प्रमाणपत्रे रुग्णालयातून कशा प्रकारे दिली आहेत, याची सखोल चौकशी करण्याचे आदेश पवार यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजे देशमुख यांना दिले आहेत. ससून सर्वोपचार रुग्णालयातून देण्यात येणाऱ्या बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या प्रकरणाची गंभीर नोंद उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे. ते स्थानिक स्वराज्य संस्थांकडून दिव्यांग व्यक्तींसाठी राखीव ठेवण्यात येणाऱ्या ५ टक्के निधीचे नियंत्रण करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत बोलत होते. जिल्हा परिषदेमध्ये काही शिक्षकांनी बोगस दिव्यांगांची प्रमाणपत्रे मिळवल्याची तक्रार बैठकीमध्ये ढवळे यांनी केली होती. ससून रुग्णालयातून गेल्या काही वर्षांपासून बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे दिली जात आहेत. त्यातून अनेक अपात्र व्यक्तींनी या प्रमाणपत्राच्या आधारे नोकऱ्यांची संधी, तसेच दिव्यांगाविषयीचे आर्थिक लाभही घेतलेले दिसून येत आहेत. (समाजातील नीतीमत्ता ढासळत चालल्याचे हे अजून एक उदाहरण ! अनेक वर्षांपासून बनावट प्रमाणपत्रे दिली जात असूनही ससून रुग्णालयावर कारवाई का केली नाही ? बनावट प्रमाणपत्रांमुळे अयोग्य व्यक्तींनी लाभ घेतल्यामुळे त्यांच्यावरही कठोर कारवाई व्हायला हवी ! – संपादक)