मुंबई – राज्यातील शाळेच्या बसगाड्यांमध्ये ‘जी.पी.आर्.एस्.’ प्रणाली बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे. नियमावलीत याचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक ठरवण्यात आले आहे. अपर पोलीस महासंचालकांनी (वाहतूक) याविषयीचा आदेश परिवहन विभागाला दिला आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी बसगाड्यांमध्ये ‘जी.पी.आर्.एस्.’ बसवण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी मुंबईतील पोदार शाळेतील बस सायंकाळी उशिरापर्यंत पोचली नव्हती. त्यामुळे पालकांनी पोलिसांत तक्रार केली होती. या घटनेमध्ये चालक रस्ता चुकल्यामुळे गाडीला विलंब झाला होता; मात्र भविष्यात अशा प्रकारे कोणती दुर्घटना होऊ नये, यासाठी काही पालकांनी गाडीमध्ये ‘जी.पी.आर्.एस्.’ प्रणाली बसवण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर बसमध्ये ती प्रणाली बसवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यामुळे गाडी कुठे आहे ? याची माहिती कळू शकेल.