सोनई (नगर) – शनिशिंगणापूर येथे ३० एप्रिल या दिवशी अमावास्या यात्रेत मंदिर परिसरात यंत्रांचा सडा पडला होता. ती पायदळी तुडवली जात असल्याने त्यांचे पावित्र्य नष्ट होत असल्याच्या तक्रारी भाविकांनी राज्य सरकारकडे केल्या होत्या. त्यानंतर विश्वस्त मंडळाने बैठक घेऊन पूजेच्या ताटातील नवग्रह, शनियंत्र, शिक्का आणि कलश यंत्र मंदिरात नेण्यास बंदी घातली आहे. यंत्रांवर बंदी आणली असली, तरी नाल विक्री आणि काळ्या तिळाचे तेल यांविषयीही मोठी फसवणूक होत आहे. नाल सिद्ध केलेली आहे, असे सांगून ५०० ते १ सहस्र रुपये घेतले जातात. हा निर्णय कायमस्वरूपी रहावा, असे भाविकांचे म्हणणे आहे. शनैश्वर देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर यांनी सांगितले की, बंदी घातलेल्या वस्तूंसह पूजेचे ताट ५०० ते २ सहस्र रुपयांना विकले जात होते. देवस्थानच्या या निर्णयाचे भाविकांनी स्वागत केले आहे. या वस्तू मंदिरात जाणार नाहीत, यासाठी सुरक्षा विभागास सूचना देण्यात आल्या आहेत.