वैशाख कृष्ण सप्तमी या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने महर्षींच्या आज्ञेने त्यांचा मंगलमय रथोत्सव साजरा करण्यात आला. अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या रथोत्सवाची छायाचित्रे संगणकावर पहातांना मला त्या छायाचित्रांत पुढीलप्रमाणे विविध टप्प्यांनुसार जिवंतपणा जाणवला. एखाद्या घटनेचे चलचित्र (Video) पहातांना ज्याप्रमाणे सर्व प्रसंग गतीमान असतात, त्याप्रमाणे ही छायाचित्रे पहातांनाही ‘प्रत्येक प्रसंगच तेथे घडत आहे’, असे जाणवते. (ही छायाचित्रे पाहण्यासाठी येथे क्लिक करा – संपादक) छायाचित्रे सजीव दिसण्याच्या संदर्भातील अनुभूती आणि त्यांमागील शास्त्र येथे देत आहे.
१. छायाचित्रांत जिवंतपणा जाणवण्याच्या संदर्भातील अनुभूती !
१ अ. रथोत्सवाचे आश्रमात आगमन होतांनाचे छायाचित्र
१ अ १. ‘गुरुदेवांचा दिव्य रथ, त्यामागील साधक, असे सर्व जण पुढे पुढे येत आहेत’, असे जाणवले.
१ अ २. या छायाचित्रात परात्पर गुरुदेव साधकांच्या भावपूर्ण जयघोषाला प्रतिसाद देत असल्याचे दिसत आहे. ते पाहून ‘परात्पर गुरुदेव साधकांशी संवाद साधत आहेत’, असे दिसले. ‘तो संवाद प्रत्यक्षच चालू आहे’, अशा प्रकारे मला त्यांचा आवाजही ऐकू आला.
१ अ ३. ‘आश्रमाच्या बाजूच्या झाडांच्या पानांची हालचाल होत आहे’, असे दिसले.
१ आ. नृत्यआराधनेची छायाचित्रे : रथोत्सवात भगवंताची नृत्यआराधना करणाऱ्या साधिकांची २ छायाचित्रे या पृष्ठावर आहेत. ती दोन्ही छायाचित्रे पाहून ते छायाचित्र नसून ‘त्या ठिकाणी प्रत्यक्ष नृत्य चालूच आहे’, असे जाणवले. ‘गीत चालू आहे. त्याच्या तालावर साधिका नृत्य करत आहेत’, असेच हे छायाचित्र पहातांना अनुभवता आले.
१ इ. टाळ वाजवणाऱ्या साधिकांचे छायाचित्र : हे छायाचित्र पहातांना ‘ते पथक पुढे पुढे जात आहे’, असे दिसून मला टाळांचा नादही ऐकू आला.
१ ई. नारायणाचा नामघोष करणाऱ्या साधिकांचे छायाचित्र : हे छायाचित्र पहातांनाही गती जाणवली. ‘साधिकांचे पथक श्रीमन्नारायणाचा नामघोष करत पुढे पुढे जात आहे’, असे जाणवले.
अशा प्रकारे विविध छायाचित्रे पहातांना ‘ते ते छायाचित्र सजीव झाले आहे आणि तो प्रसंग प्रत्यक्षात समोर घडत आहे’, असे एखादे चलचित्र (Video) पहात असल्याप्रमाणे दृश्य दिसले.
२. श्रीमन्नारायणस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा रथोत्सव ईश्वरी तत्त्वाची अनुभूती देणारा असल्यामुळे त्याची छायाचित्रे पहातांना पंचमहाभूतांच्या स्तरावरील अनुभूती येणे
‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे साक्षात् श्रीमन्नारायणाचे अवतार आहेत’, असे सप्तर्षी वारंवार सांगतात. याची अनुभूती साधकही घेत आहेत. जे साक्षात् ईश्वराशी संबंधित असते, ते मायेशी निगडित नसून शाश्वत असते. ते चिरंतन टिकणारे आणि आत्मानंद देणारे असते. त्यामुळे सात्त्विक घटकांमध्ये जिवंतपणा दिसून येतो. साधक, संत यांनी भक्तीभावाने अनुभवलेला हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा रथोत्सव साधक आणि संत यांच्या मनमंदिरात कायमचा कोरला गेला आहे. त्यामुळे त्या दिव्य रथोत्सवाच्या छायाचित्रांमध्ये जिवंतपणा (तेजतत्त्व) दिसून छायाचित्रांतील व्यक्तींची हालचाल जाणवणे (वायुतत्त्व), टाळांचा नाद जाणवणे (आकाशतत्त्व) अशा पंचमहाभूतांच्या स्तरावरील अनुभूती आल्या.
केवळ काही छायाचित्रे पाहून अशा उच्च स्तराच्या अनुभूती येतात. दिव्य वातावरणात पार पडलेल्या रथोत्सवात किती प्रमाणात ईश्वरी तत्त्व कार्यरत झाले असेल, याची कल्पना या छायाचित्रांवरून करता येते ! ज्यांच्या केवळ अस्तित्वानेही छायाचित्रांना जिवंतपणा येण्यासारख्या विविध उच्च अनुभूती अनुभवता येतात, ते श्रीमन्नारायणस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता ! ‘दिव्य रथोत्सवाच्या चैतन्यमय छायाचित्रांचा सर्वांना आध्यात्मिक स्तरावर लाभ व्हावा’, अशी परात्पर गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना !
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ (२७.५.२०२२)
साधकांना भरभरून आनंद देणाऱ्या या रथोत्सव सोहळ्यातील दिव्य आणि चैतन्यमय छायाचित्रांचा ग्रंथ लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे ! |
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |