परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…
१. ज्ञानयोगानुसार – परात्पर गुरु डॉ. आठवले अध्यात्मातील ‘विज्ञानी’ स्थितीत असल्याने त्यांनी स्वत:ला गुरु न समजणे
साक्षीत्व (वृत्तीपूरक), उन्मनी (निवृत्ती) आणि विज्ञानी (निर्गुणधारणा) अशा संतांच्या तीन प्रमुख स्थिती असतात. साक्षीत्वाच्या स्थितीत केवळ साक्षीभावाने बघितले जाते. अधिकतर व्यष्टी साधना करणारे संत या स्थितीला असतात. उन्मनी स्थितीतील संत मनातून निवृत्त झालेले असल्याने त्यांच्यावर नाती, पद, मान-सन्मान, म्हणजे मायेतील कोणत्याही घटकाचा काही परिणाम होत नाही, तसेच त्यांच्याकडून फारसे कार्यही होत नाही. या दोन्ही स्थितीहून वेगळी आणि निर्गुणधारणा यांवर आधारित तिसरी अवस्था असते ‘विज्ञानी’. ज्या स्थितीत ज्ञानाचे भान रहात नाही, त्या स्थितीला ‘विज्ञानी’ असे म्हणतात. या स्थितीत साक्षीभाव, तसेच निवृत्ती (घटनेकडे दुर्लक्ष करणे) असे नसते. प्रत्येक घटना, अनुभूती, माहिती याकडे ज्ञान ग्रहण करण्याच्या दृष्टीने, म्हणजे प्रयोग आणि संशोधन यांच्या दृष्टीने बघितले जाते आणि अपेक्षित कृतीही त्यात समाविष्ट असते. अंदाजे वर्ष २०२० पासून परात्पर गुरु डॉ. आठवले या स्थितीत आहेत. या स्थितीमुळे परात्पर गुरु डॉ. आठवले स्वत:ला गुरु समजत नाहीत; पण त्यांच्या या संशोधनात्मक स्थितीमुळे समष्टीला त्यांच्याकडून काळानुसार आवश्यक तसे मार्गदर्शन मिळते. यामुळे राष्ट्रगुरु, धर्मगुरु, साधनागुरु आणि मोक्षगुरु म्हणजे समष्टी गुरुस्वरूपाची अनेक दायित्वे ते ‘स्वत: गुरु आहे’, असे भान न ठेवता पार पाडत असतात.
२. भक्तीयोगानुसार – साधकांना अद्वैताकडे, म्हणजे निर्गुणाकडे नेण्यासाठी ईश्वरेच्छेने परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अद्वैत अवस्थेत रहाणे
२ अ. समष्टी साधनेमुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यात ईश्वरेच्छेचे प्रमाण अधिक असणे : अधिकतर संत व्यष्टी साधना शिकवणारे असल्याने त्यांच्यात ईश्वरेच्छेसमवेत स्वेच्छेचे प्रमाणही अधिक असते. स्वेच्छेचे प्रमाण अधिक असल्याने अन्य संतांमध्ये गुरुपणा म्हणजे ‘मी गुरु आहे’, हा भाव जागृत रहातो. याउलट समष्टी साधनेमुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यात ईश्वरेच्छेचे प्रमाण अधिक आहे. ईश्वरेच्छेचे प्रमाण अधिक असल्याने त्यांच्यात गुरुपणा म्हणजे ‘मी गुरु आहे’, हा भाव जागृत होत नाही.
२ अ १. अन्य संत आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील स्वेच्छा, परेच्छा आणि ईश्वरेच्छा यांचे प्रमाण (टक्के)
२ आ. स्वेच्छेमुळे काही संतांनी शिष्यांना द्वैतात अडकवणे, तर ईश्वरेच्छेमुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वत:ला अद्वैतात ठेवल्याने व्यापक समष्टीची आध्यात्मिक उन्नती होणे : काही संतांमध्ये कार्यरत स्वेच्छेमुळे त्यांच्यात ‘स्वत:ला गुरु समजणे’, असा भाव जागृत असतो. ‘स्वत:ला गुरु समजणे’ याला ‘सात्त्विक कर्तेपणा’ असेही म्हणतात. या सात्त्विक कर्तेपणामुळे संतांना शिष्यांच्या आध्यात्मिक उन्नतीची काळजी असून ‘शिष्यांनी त्यांच्या (गुरूंच्या) मतानुसार, दृष्टीकोनानुसार वागावे’, असे त्यांना वाटते. यामुळे ईश्वर (ज्ञान देणारा) – गुरु (ज्ञान ग्रहण करणारा) – शिष्य (ज्ञानाची आवश्यकता असणारा) या पद्धतीने ईश्वरी चैतन्य आणि ज्ञान कार्यरत होते. या प्रक्रियेत शिष्य स्वत: स्वावलंबी न होता गुरूंवर निर्भर रहातो. या स्थितीत शिष्य द्वैतात, म्हणजे देव आणि गुरु यांच्यात अडकून पडतो. या प्रकारच्या शृंखलेमुळे अधिकतर शिष्य तत्त्वाकडे न जाता गुरूंच्या देहामध्ये अडकून पडतात आणि त्यांची आध्यात्मिक प्रगती होत नाही किंवा अत्यल्प गतीने होते.
याउलट ईश्वरेच्छेने परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना थेट देवाच्या अनुसंधानात रहाणे, म्हणजे ‘अद्वैत’ स्तराची साधना शिकवली आहे, उदा. वर्ष २००९ मध्ये अनेक साधकांचा प.पू. डॉक्टर किंवा परात्पर गुरु डॉक्टर असा नामजप आपोआप होत असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांना श्रीकृष्णाचा नामजप करण्यासाठी सांगितले. याप्रकारे त्यांनी साधकांना देहात न अडकवता तत्त्वाकडे जाण्यास शिकवून स्वावलंबी केले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांकडून अद्वैत स्तराची साधना करवून घेतली. गुरूंनी सांगितल्याप्रमाणे साधना केल्यामुळे साधकांना त्यांच्या प्रकृतीनुसार सेवा, भावस्थिती अशा विविध माध्यमांतून ईश्वराशी थेट अनुसंधान म्हणजे अद्वैत साधता आले. साधकांची समष्टी सेवा असल्याने त्यांनी या प्रकारे अद्वैत साधल्यामुळे ईश्वर (ज्ञान देणारा) – भक्त (ज्ञान घेणारा) या प्रकारे मध्ये अन्य त्रयस्थ माध्यम आवश्यक नसते. चैतन्य आणि ज्ञान यांची समष्टी स्तरावर देवाण-घेवाण कार्यरत होते. यामुळे अनेक साधकांना अंतरातून साधनेचे प्रयत्न सुचणे किंवा समष्टीसाठी आवश्यक भाव अन् भक्ती यांच्या स्तरांवरील सूत्रे किंवा आध्यात्मिक उपाय कळत आहेत, उदा. सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांना साधकांना कोरोनासहित होणाऱ्या विविध शारीरिक त्रासांवर वैशिष्ट्यपूर्ण नामजप सूक्ष्मातून कळतो.
या प्रक्रियेत साधकांना ‘श्रीकृष्णच गुरु आहे’, असे सांगून परात्पर गुरु डॉ. आठवले स्वत: अद्वैताच्या स्थितीत राहिले. या अद्वैत स्थितीमुळे त्यांच्या मनात ‘मी गुरु आहे’, असा भाव जागृत होत नाही. याउलट ‘श्रीकृष्णाशी अनुसंधान साधणाऱ्या अन्य साधकांप्रमाणे मीही एक साधक आहे’, अशा स्थितीत ते रहातात. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अशी अद्वैत स्थिती गाठली नसती, तर समष्टी साधना करणारे अनेक संत आणि सद्गुरु निर्माण न होता देहात अडकणारे सांप्रदायिक शिष्य निर्माण झाले असते. अशा प्रकारे ईश्वरेच्छेने परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांकडून अद्वैत स्तराची साधना करवून घेतल्यामुळे आज सनातनचे १०० हून अधिक संत आणि सद्गुरु सिद्ध झाले आहेत.
३. कर्मयोगानुसार – समष्टी ज्ञानोत्तर कार्यांतर्गत परात्पर गुरु डॉ. आठवले हे शिकण्याच्या स्थितीत राहिल्याने त्यांनी स्वत:ला गुरु न समजणे
३ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून ज्ञानोत्तर कार्य होणे : ‘साधनेचे ज्ञान देऊन अहंरूपी अज्ञान नष्ट करतो, तो गुरु’, अशी गुरु स्वरूपाची सर्वसाधारण व्याख्या आहे. ज्या वेळी गुरु ठराविक शिष्यांच्या प्रगतीचा विचार न करता समष्टी स्तरावरील साधना करणाऱ्या विविध प्रकृतीच्या जिवांचा विचार करून कार्य करतात, त्या प्रक्रियेला गुरूंचे ‘ज्ञानोत्तर कार्य’, असे म्हटले जाते. यांत केवळ एका शिष्यासाठी आवश्यक असे दृष्टीकोन किंवा साधनेचे तत्त्व नसून पूर्ण समष्टीला आवश्यक दृष्टीकोन किंवा साधनेचे तत्त्व यांचा समावेश असतो. वर्तमानकाळात परात्पर गुरु डॉ. आठवले विविध विषयांवरील ग्रंथमालिकांच्या संकलनाच्या माध्यमातून ज्ञानोत्तर कार्यच करत आहेत.
३ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले शिष्यावस्थेत राहिल्याने गुरुतत्त्वाने समष्टीला मार्गदर्शन करणारे विविध गुरु उपलब्ध करून देणे : व्यष्टी साधनेत मन, बुद्धी आणि अहं यांचा लय करून आध्यात्मिक प्रगती करता येते. याउलट समष्टी साधनेत मन, बुद्धी आणि अहं यांच्या लयासोबतच स्वत:मध्ये अनेक गुणांचे संवर्धन करावे लागते. यामुळे व्यष्टी साधना करणाऱ्यांना एका देहरूपी गुरूंचे मार्गदर्शन आवश्यक असते, तर समष्टी साधना करणाऱ्यांना गुरुतत्त्व विविध देहधारी गुरु स्वरूपांच्या माध्यमातून मार्गदर्शन करते. हेच तत्त्व ग्रंथनिर्मिती संदर्भातही लागू होते. ‘जिज्ञासू हाच ज्ञानाचा अधिकारी’, या आध्यात्मिक तत्त्वानुसार ईश्वरही जिज्ञासा असलेल्यांना त्यांच्या क्षमतेनुसार प्रत्यक्ष ज्ञान किंवा ते ज्ञान समजावून सांगण्याची क्षमता असलेले मार्गदर्शक प्रदान करतो. वर्तमानकाळात भूतलावर मन, बुद्धी आणि अध्यात्म या तिन्ही स्तरांवर सूत्र समजण्याची क्षमता असलेले परात्पर गुरु डॉ. आठवले एकमेव आहेत. यामुळे साधना करणाऱ्या समष्टीला आवश्यक ज्ञान देऊन भावी आपत्काळापासून तिचे रक्षण आणि त्यांचे आध्यात्मिक कल्याण करण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले गुरुस्वरूपात न रहाता शिष्य भावात, म्हणजे शिकण्याच्या स्थितीत रहातात. परात्पर गुरु डॉ. आठवले अशा शिकण्याच्या स्थितीत रहात असल्याने समष्टीला आवश्यक अशा विविध विषयांवर तात्त्विक आणि प्रायोगिक स्तरावरील मार्गदर्शन करणारे जीव सनातनला लाभत आहेत, उदा. भावी आपत्काळासाठी उपयोगी ‘बिंदूदाबन’ या उपचारपद्धतींची ग्रंथमालिका सिद्ध करायचे ठरल्यावर आपोआप ऑक्टोबर २०१४ मध्ये मडगाव, गोवा येथील ‘बिंदूदाबन’ या विषयातील तज्ञ श्री. विनायक चंद्रकांत महाजन हे सनातनच्या रामनाथी आश्रमात स्वत:हून आले. तसेच ‘औषधी वनस्पतींची लागवड करा !’ हा ग्रंथ काढण्याचे ठरल्यावर वर्ष २०१४ मध्ये याविषयी ज्येष्ठ वनस्पती-शास्त्रज्ञ डॉ. दिगंबर मोकाट यांना संपर्क केला असता त्यांनी यासंदर्भात बहुमोल मार्गदर्शन केले. याच प्रकारे वर्तमानकाळात गायन, नृत्य, वाद्य अशा संगीताच्या विविध क्षेत्रांमध्ये तज्ञ असलेले जीव येऊन संगीत संदर्भातील विविध शोधकार्यात साहाय्य करत आहेत.
याप्रकारे समष्टी स्तरावरील बहुमूल्य ज्ञाननिर्मितीचे कार्य करण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले शिष्यावस्थेत रहात असल्याने त्यांच्या मनात ‘मी गुरु आहे’, असा भाव निर्माण होत नाही. याउलट परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांची गुरुवस्था टिकवून ठेवली असती, तर उपचारपद्धती, लागवड, संगीत अशा विविध क्षेत्रांतील ज्ञान समष्टीला मिळाले नसते. यामुळे समष्टी कल्याणासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले गुरुस्वरूपात न रहाता शिष्यावस्थेत रहात आहेत.
४. कृतज्ञता
संत म्हणजे करुणेचे महामेरु. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे राष्ट्रगुरु, धर्मगुरु, साधनागुरु आणि मोक्षगुरु आहेत’, याची प्रचीती अनेक साधकांनी घेतली आहे. ते अनेकांचे स्फूर्तीस्थान आहेत, असे असूनही ते स्वत:ला गुरु समजत नाहीत. ‘त्यांनी स्वत:ला गुरु न समजणे’, यांतूनही त्यांच्यात किती उच्च स्तराचे समष्टी कल्याण दडलेले आहे, हे वरील ज्ञानातून स्पष्ट होते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अशा अती उच्च आणि निर्गुणाशी संबंधित स्थितीसंदर्भात ईश्वरी ज्ञान मिळवून ते मांडता आले, यासाठी भगवान श्रीकृष्ण अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती कोटीशः कृतज्ञता !
– श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.५.२०२२, सायं ५.४१)
|